Satpura Bhawan Fierce fire: भोपाळच्या सातपुडा भवन या इमारतीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या इमारतीत शासकीय विभागांची अनेक कार्यालये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं.
नियंत्रणाबाहेर गेलेली ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दीड डझनहून अधिक गाड्या घटनास्थळी पाचारण करण्यात आल्या. मात्र तरी ही भीषण आग पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीत अनेक विभागांची मुख्य कार्यालये जळून खाक झाली आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचीही मदत मागितली. मीडिया रिपोर्ट्सनुसार लष्कराचे हेलिकॉप्टर सोमवारी रात्री भोपाळला पोहोचतील, ही आग विझवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली जाणार आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या टीमसह भारतीय लष्कराचे जवान घटनास्थळी मदत करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीआयएसएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
सातपुडा भवनाच्या आगीवर राजकारण तापलं
आगीच्या विळख्यात सापडलेल्या भोपाळच्या सातपुडा भवनमध्ये आदिवासी कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मागासवर्गीय कल्याण विभागाची कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या घटनेत कोविडचे सर्व रेकॉर्ड जळून राख झाले असून दवाखानाही पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीएम शिवराज सिंह चौहान स्वतः लक्ष ठेवून आहेत. सातपुडा भवनला लागलेल्या आगीमुळे राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितू पटवारी यांनी मुख्यमंत्री शिवराज यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भ्रष्टाचाराचे 50 टक्के पुरावे जळून खाक झाले आहेत, ही आग लागली आहे की लावली आहे? असा सवा पटवारी यांनी उपस्थित केला आहे. (Breaking News)
काँग्रेसचा शिवराज सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसने या आगीवर शिवराज सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आता काँग्रेसचे सरकार येणार हे सरकारलाही कळले आहे, त्यामुळे पुरावे नष्ट केले जात आहेत असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार कुणाल चौधरी म्हणाले की, निवडणुका आल्या की सरकारी कार्यालये का पेटवली जातात. निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचाराच्या फायली खोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे. 2018 च्या निवडणुकीपूर्वी देखील अशी आग लागली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.