मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यात यावे यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेत नोटिसा दिल्या आहेत. रिपोर्टनुसार, विरोधी पक्षांच्या १९३ खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत हा प्रस्ताव दाखल केला आहे. यात लोकसभेतील १३० आणि राज्यसभेतील ६३ खासदारांचा समावेश आहे. भारतीय संसदेच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. विशेषतः तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वात हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात इंडिया आघाडीतील सर्व पक्ष, आम आदमी पक्ष आणि काही अपक्ष खासदारांनीही या कारवाईच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
विरोधी पक्षांच्या खासदारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी संसदेत दिलेल्या नोटिशींमध्ये सात प्रमुख आरोप केले आहेत. त्यात पक्षपाती वर्तवणूक, निवडणूक गोंधळाच्या चौकशीत जाणूनबुजून अडथळा आणणे, मोठ्या संख्येने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवणे, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेला प्रभावित करणे असे आरोप आहेत.
विशेषतः पश्चिम बंगालमध्ये एसआयआर प्रक्रियेच्या काळात लाखो अधिकृत मतदारांची नावं हटवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपला फायदा मिळवून देण्याचा हा कट असल्याचंही विरोधकांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर टीकाही केली होती. विरोधी पक्षांच्या मतदारांना लक्ष्य करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय, बिहार आणि अन्य राज्यांमध्येही एसआयआरवरून वाद झाला होता. निवडणूक काळात गडबड करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या आधीपासून अशा प्रकारचे आरोप होत आहेत.
निवडणूक आयोग आता निष्पक्ष राहिलेला नाही. सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. खासदारांनी संसदेत सादर केलेल्या नोटिशीत संविधानातील अनुच्छेद ३२४ (५) चा हवाला दिला असून, त्यात मुख्य निवडणूक आयुक्तांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांप्रमाणे हटवण्याची प्रक्रिया परिभाषित करण्यात आली आहे. महाभियोग प्रस्तावासाठी दोन्ही सभागृहांमध्ये दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. तो सध्या विरोधी पक्षांकडे नाही. सरकार किंवा निवडणूक आयोगाकडून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
यावर भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांकडून सातत्याने अशा प्रकारे स्वायत्त संस्थांवर हल्ले करण्यात येत आहेत, हे दुर्दैवी आहे. ज्या प्रकारे लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव नामंजूर झाला, तसंच मुख्य निवडणूक आयुक्तांवरील प्रस्तावही फेटाळला जाईल असा आम्हाला विश्वास आहे, असे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.