संजय गडदे, साम टिव्ही
मुंबई पोलीस दलातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी आपल्या साथीदारासह अंधेरी पश्चिमेकडील एका पान टपरी चालविणाऱ्याचे अपहरण करून ४३ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चारही जणांना अटक केली असून या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. चंद्रशेखर दराडे, हेमंत कापसे, सागर वाघ आणि नितीन गाढवे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यातील चंद्रशेखर दराडे आणि हेमंत कापसे यांना हे प्रकरण उघडकीस येताच सेवेतून निलंबित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेकडील एस व्ही रोडवर मोहम्मद अरिफ खान भाड्याने पान टपरी चालवण्याचा व्यवसाय मागील अनेक वर्षांपासून करत आहे. मागील आठवड्यात एक आर्टिका कार दुपारच्या वेळी त्यांच्या टपरी समोर येऊन उभे राहिली. यानंतर त्या कारमधील दोघेजण खाली उतरून त्यांनी टपरी चालकाला आपण अन्न व औषध प्रशासन विभागात इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. तू या टपरीवर गुटखा विकतोस असे म्हणत आरिफला आर्टिका कार मध्ये बसवले. कार दादरच्या दिशेने जात असताना या चौघांनी आरिफ कडे पैशांची मागणी केली. जर तू पैसे दिले नाहीस तर तुझ्या विरोधात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करू असे
आरिफला धमकावत त्यांनी त्याच्याकडील खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने घेतले. शिवाय आरिफच्या मित्राकडून तीस हजार रुपये ऑनलाईन मागवून घेतले आणि पुन्हा आरिफची झडती घेऊन साडेतीन हजार रुपये देखील उकळले अशाप्रकारे अपहरणकर्त्यांनी एकूण त्रेचाळीस हजार पाचशे रुपये जबरदस्तीने उकळले आणि आरिफला सोडून दिले. यानंतर आरिफ घरी आल्यानंतर त्याने घडलेला सर्व प्रकार आपले कुटुंबीय आणि मित्रांना सांगितला. मित्रांच्या सल्ल्यावरून आरिफने डी एन नगर पोलीस ठाणे येथे जाऊन या चौघां विरोधात तक्रार दिली आरिफच्या या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून घेतला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डी एन नगर.पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरात असणाऱ्या पान टपरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून वाहन क्रमांकाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. या गुन्ह्यात सहभागी असलेले चंद्रशेखर दराडे, हेमंत कापसे, सागर वाघ आणि नितीन गाढवे यांना अटक केली. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चंद्रशेखर दराडे आणि हेमंत कापसे या पोलीस कर्मचाऱ्यांचे सेवेतून तात्काळ निलंबन करण्यात आले असून पोलीस अधिकचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.