ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाच्या गर्डर बसविण्याचं काम
४ ऑक्टोबर तसेच ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे.
ठाणे-बेलापूर रोडवरील वाहनचालकांसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.
ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाच्या कामाला वेग आला असून, या मार्गावरील महत्त्वाच्या गर्डर बसविण्याच्या कामासाठी ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूक चार रात्री बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबत वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. ४ ऑक्टोबर तसेच ९, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत हा वाहतूक निर्बंध लागू राहणार आहे. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्गही जाहीर केले आहेत.
ठाणे-बेलापूर रोडवर ऐरोली येथील भारत बिजली आणि सिमेन्स कंपनीजवळ ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गासाठी पुलाचे गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रात्रीच्या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
ठाण्याकडून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या सहा चाकी आणि त्यापेक्षा मोठ्या वाहनांना दिघा येथील मुकुंद कंपनीपासून एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे. तर चारचाकी वाहनांना भारत बिजली चौकातून उजवीकडे वळून ऐरोली फायर ब्रिगेड चौकातून डावीकडे वळत खेडेकर चौकमार्गे पुढे जाता येणार आहे.
बेलापूरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी रबाळे नाका सिग्नल येथून वळण घेऊन एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याने मुकुंद कंपनीमार्गे पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. तसेच पटणी मार्गे जाणाऱ्या वाहनांना रबाळे नाका–दिवा गाव सर्कल–पटणी रोडचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या कालावधीत संबंधित रस्त्यावर वाहने उभी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. मात्र उन्नत मार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणारी एमएमआरडीएची वाहने या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत. वाहनचालकांनी रात्रीच्या प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.