मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session 2022) आज शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याबाबतही विरोधकांना सरकारला धारेवर धरले. "ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापतयं" असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. तसेच प्रवीण दरेकरांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबतही फडणवीसांनी सरकारवर टिका केली आहे. ("Thackeray government cuts electricity of farmers in Sultani manner" - Devendra Fadnavis)
हे देखील पहा -
विधानसभेत फडणवीस म्हणाले की, आज कोणी सदस्य मतदारसंघात गेले की विचारतात वीज जोडणी कधी होणार. इतके दिवस झाले राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की वीज कनेक्शन कापणार नाही, त्या घोषणेचे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच घोषणा करायची वीज कनेक्शन (Power Cut) तोडायचं यामुळे शेतकरी कोणाला माफ करणार नाही असंही ते म्हणाले. पुढे फडणवीस म्हणाले की, किती शेतकरी मेल्यावर चर्चा करणार? यानंतर विधानसभेत गोंधळ झाला आणि एक वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आलं. वीज प्रश्नावरून चौथ्यांदा हे कामकाज स्थगित करण्यात आलं.
कामकाज स्थगित झाल्यानंतर फडणवीस बाहेर आले आणि शेतकरी वीज तोडणी करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन सुरू झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांची वीज तोडणी केलेल्या सरकारचा आम्ही सभागृहात विरोध केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीज तोडली जाणार नाही असे सांगितले होते, पण शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. जोपर्यंत सरकार यावर चर्चा करत नाही तोपर्यंत हा मुद्दा आम्ही लावून धरू असं फडणवीस म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुंबै बॅंकेच्या निवडणुकीसाठी मजूर प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता, याप्रकरणी त्यांच्यावर फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फडणवीस म्हणाले की, प्रवीण दरेकर हे मजूर सवर्गातून निवडून आले असे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला. जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकशाही पायदळी तुडविण्याचे काम जो करतो तोच खड्ड्यात पडतो असा टोला त्यांनी सरकारल लगावला आहे.
पुढे त्यांनी सरकारवर आरोप केला कि, काल मी सांगितले होते, आम्हाला अडकविण्याचा कट रचला जात आहे. आज उच्च न्यायालयाने ईडीची कारवाई योग्य आहे हे सांगितले आहे. दाऊदच्या सोबत मनी लॉंड्रीग करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा सरकार केव्हा घेणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हिजाब प्रकरणाबाबत ते म्हणाले की, स्थानिक स्वतंत्र असल्याने हिजाबचा निर्णय झाला आहे. स्पष्ट निर्णय न्यायालयाचा आला आहे, वाद वाढवणाऱ्यांनी आता तरी गप्प बसावे असं आवाहन फडणवीसांनी केलं.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.