राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, "ही राजकारणाची नव्हे तर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची वेळ आहे," असे स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून तातडीने ५ हजार रुपयांची मदत, दिवाळीचा शिधा, तसेच सामूहिक विवाहासारखे उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधकांवर जोरदार पलटवार करताना, उभी पिके करपलेली असताना मुंबईत मोर्चे काढणारे आणि सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणणारे देश बुडवायला निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, "ही राजकारणाची नव्हे तर शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याची वेळ आहे," असे स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये म्हणून तातडीने ५ हजार रुपयांची मदत, दिवाळीचा शिधा, तसेच सामूहिक विवाहासारखे उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधकांवर जोरदार पलटवार करताना, उभी पिके करपलेली असताना मुंबईत मोर्चे काढणारे आणि सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणणारे देश बुडवायला निघाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने होणाऱ्या टिकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले एक दिवसही सुट्टी न घेणाऱ्या पंतप्रधानांवर खालच्या भाषेत आरोप करणे म्हणजे देशप्रेम नव्हे. विरोधक केवळ तरुणाईला भडकवण्याचे आणि गर्दी जमवून भाषणे ठोकण्याचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, तुमच्याच पक्षात 'रेजीम चेंज' (सत्ता बदल) कसा झाला हे तुम्हालाच कळले नाही, अशी उपरोधिक टीका करत ईव्हीएम (EVM) आणि निवडणुकीतील पराभवावरून विरोधकांना धारेवर धरले.
परदेशात मराठीचा डंका वाजवल्यावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केल्यावर विरोधकांच्या पोटदुखीत भर पडत असल्याचा उपरोधिक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. आपण लंडनमध्ये जाऊन त्यांच्याच भाषेत बोललो, मराठीत संवाद साधला किंवा दिल्लीला गेलो तरी विरोधकांचा अनावश्यक जळफळाट होत असल्याचे सांगत त्यांनी, कोणाला कुठे बसवायचे हे जनता जनार्दन ठरवत असते, असे ठामपणे म्हटले.
सोन्याविषयीच्या विधानावर आणि आंदोलनांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "दशम्याच्या दिवशी सोनं लुटायचं सांगणे हा एक सांस्कृतिक संकेत आहे, ज्याचा अर्थ 'सोन्यासारखे राहा' असा होतो. पण आपले पंतप्रधान सांगतात की सोनं खरेदी करू नका! आजची स्थिती अशी झाली आहे की सकाळी उठून साडेतीन मुहूर्त पाहायचे आणि न्यायाची भीक मागायची. पण न्यायव्यवस्था, सरकार आणि पोलीस कोठेही न्याय मिळत नसेल, आणि जनता चिडून रस्त्यावर उतरली, की लगेच त्यांना 'नक्षलवाद' ठरवले जाते. सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की आंदोलनामध्ये सभ्यता हवी, पण लोकांच्या अधिकारांची पायमल्ली होत असताना हा असंतोष असाच उसळणार!"
टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे संताप व्यक्त करत म्हणाले, "टायगर श्रॉफवर हल्ला झाला आणि हा 'चमको' नेता लगेच तिथे पळत गेला. पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपी पकडले, याचे कौतुक करायचे का आणखीन काय करायचं? सुदैवाने तो तरुण (पोरगा) वाचला. कसल्या पद्धतीचे सरकार चालवता तुम्ही? पोलीस आणि इतर यंत्रणांनी बाकी सगळी कामे केली आहेत, पण गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत. तुमच्या नाकाबंद्या कशासाठी असतात? आमच्याकडे साधा वाद झाला की पोलीस लगेच हजर होतात, मग हे उघडपणे शस्त्र घेऊन आलेले लोक पोलिसांना दिसत नाहीत का? हे राज्यात शस्त्र घेऊन आले कसे? तुम्ही आरोपींना पकडले हे मान्य, पण जर एखादा मोठा घात झाला असता, तर कोणत्या तोंडाने तुम्ही यशाची टिमकी वाजवली असती? ते शस्त्र घेऊन आले तेव्हाच यंत्रणेला कळायला हवे होते आणि तेव्हाच त्यांना जागेवर रोखायला हवे होते. कुणालाच कसली लाज-लज्जा उरलेली नाही."
महाराष्ट्राला शहरी नक्षलवाद म्हणताना जीभ झडत कशी नाही?
आंदोलन करणाऱ्या तरुणांवर आणि विद्यार्थ्यांवर 'शहरी नक्षलवाद' असल्याचा शिक्का मारल्याबद्दल ठाकरे संतापले. ते म्हणाले, "छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला शहरी नक्षलवाद बोलताना तुमची जीभ झडत कशी नाही? महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला कलंक लावण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मला सांगा, हे शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय? ही मुलं रस्त्यावर कशासाठी उतरत आहेत?" पंतप्रधान मोदींच्या कारभारावर टीका करत ते म्हणाले की, ही मुलं हातात तिरंगा घेऊन न्यायासाठी रस्त्यावर जातात, पण त्यांना अडवले जाते.
भागवतांना माझा सवाल, स्वातंत्र्यानंतर मुख्यालयावर तिरंगा का फडकावत नव्हता?
संघप्रमुख मोहन भागवत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले, "माझं सरसंघचालक भागवत यांच्याशी काही व्यक्तिगत भांडण नाही, पण आज मला त्यांना विचारायचं आहे की, देश स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही नागपूरच्या मुख्यालयावर इतकी वर्षे तिरंगा का फडकावत नव्हता?"
दसरा सणाच्या परंपरेवर बोट ठेवताना ठाकरे म्हणाले, "दशम्याच्या दिवशी आपण सोनं लुटायचं सांगतो, तो एक सांस्कृतिक संकेत आहे. 'सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा' असा यामागचा संदेश असतो. पण दुसरीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात की सोनं खरेदी करू नका!"
तसेच, राज्यातील निवडणुका आणि राजकीय स्थितीवर टीका करताना त्यांनी, "जिथं आमची मतेच लुटली जातात, तिकडे आता दुसरं काय लुटायचं बाकी ठेवलंय तुम्ही?" असा सवाल करत सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला.
शिवाजी पार्कावरील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकरी वर्गाच्या दयनीय स्थितीवरून सरकारला तीव्र शब्दांत धारेवर धरले. नुकत्याच दिलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर बोट ठेवत, हे उपकार नाही तर शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे, असा घणाघात त्यांनी केला.
पिकांचे पंचनामे, रखडलेली कर्जमाफी, अपूर्ण नमो किसान योजना आणि कागदावरच फिरणाऱ्या केंद्रीय पथकावरून सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरही हाच भगवा फडकवण्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना व्यक्त केला. कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, राज्यावर ओढवलेले दुष्काळाचे संकट अतिशय आक्राळ-विक्राळ रूप धारण करणार असल्याचा इशारा देत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.
वाढती बेरोजगारी, देशातील सद्यस्थिती आणि राम मंदिराच्या दानावरून होत असलेल्या भ्रष्टाचारावर कडाडून टीका करत मोदी-शहा सरकारवर गंभीर आरोप राऊत यांनी केली. तरुणांना अंधभक्त बनवून प्रश्न विचारण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप करतानाच, राम मंदिराच्या दानपेठा आणि दागिन्यांच्या चोरीचे गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. जनतेची पिळवणूक करणाऱ्या या भ्रष्ट सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली असून, महाराष्ट्रातून सुरू झालेल्या या जनक्षोभाचे सेनापती उद्धव ठाकरे असल्याचे सांगत सरकारविरोधात एल्गार पुकारण्यात आल्याचे राऊत म्हणाले.
मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत खासदार संजय राऊत यांनी, लोकांना सुरक्षा हवी असेल तर शिवसेना हेच एकमेव शस्त्र असल्याचे म्हटले आहे. प्रभू श्रीरामांचे उदाहरण देत त्यांनी, "आम्ही धनुष्यबाण सोडणार नाही आणि सुरू असलेल्या खटल्यात पुढच्या दसऱ्याला धनुष्यबाण फक्त आपलाच असेल," असा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच, देशात 'जेन जी'चा (Gen Z) जमाना असून त्यांचे नेतृत्व आदित्य ठाकरे करत असल्याचे सांगत, या तरुण पिढीने नरेंद्र मोदींना अडचणीत आणल्याचा दावा करत त्यांनी भाजपच्या आयटी सेलवर जोरदार टीका केली.
राज्यातील गंभीर दुष्काळ, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ढासळलेली कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवरवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुष्काळग्रस्तांना चारा छावण्यांऐवजी थेट बांधावर मदत देण्याची मागणी करतानाच, त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अंडरवर्ल्डचे कनेक्शन, कायदा व सुव्यवस्था आणि MPSC भरतीतील गैरव्यवहारावरून थेट सवाल उपस्थित केले आहेत. महिलांच्या सुरक्षेपासून ते बॉलिवूडमधील सुरक्षेच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत, "आम्ही शिवसेनेसाठी लढताना जीव गेला तरी मागे हटणार नाही," असे आक्रमक उद्गार त्यांनी काढले.
दसऱ्याच्या मेळाव्यानिमित्त बोलताना खासदार ज्योती वाघमारे यांनी राज्यावर असलेल्या दुष्काळाच्या सावटावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हा मेळावा थाटामाटाचा नसून पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित असल्याचे सांगत त्यांनी, "आपले नेते 'देना बँक' आहेत तर समोरचा मेळावा 'लेना बँक' आहे," अशा शब्दांत विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असून हा मेळावा सत्तेसाठी नसून जनहितासाठी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना ही सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि मजुरांचा आवाज म्हणून स्थापन केली होती. आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्व शिवसैनिक बळीराजाच्या हक्कासाठी लढत आहेत. गेल्या वर्षभरात १,५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; त्यांच्या विधवा पत्नींच्या डोळ्यांतील अश्रूंचा हिशोब मागण्यासाठी मी आज उभा आहे," अशा आक्रमक शब्दांत ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.
सरकारच्या फसव्या पॅकेजवर ताशेरे ओढताना पाटील म्हणाले, "राज्यात ६८ लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण हे पैसे नक्की गेले कुठे? ७ हजार एकर जमीन खरडून गेली, तेव्हा हेक्टरी ३ लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली होती. माणसांमधील असा एकतरी शेतकरी दाखवा ज्याला ३ लाख रुपये मिळाले आहेत, हे माझे थेट आव्हान आहे! जाहिराती आणि घोषणा खूप झाल्या, पण प्रत्यक्षात रोजगार हमी योजनेचे पैसे आणि पीक विम्याचे १७ हजार रुपयेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत."
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर महायुतीचे नेते तथा मंत्री दादा भुसे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. जरांगे यांच्या टीकेवर बोलताना दादा भुसे म्हणाले की, कोणाचेही सर्टिफिकेट घेण्याची आम्हाला गरज नाही. एकनाथ शिंदे नेहमीच उत्तम आणि लोकोपयोगी काम करत आहेत, त्यामुळे विरोधक किंवा आरोप करणाऱ्यांना आरोप करू द्यावा.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे शिवसेनेचे आमदार, खासदार, नेते मंचावर स्थानापन्न
सचिन आहीर, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, श्रीरंग बारणे, ज्योती वाघमारे यांच्यासह सर्व नेते व्यासपीठावर यायला सुरुवात
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी ५०० कोटींच्या केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते तथा आमदार योगेश कदम यांनी जरांगे यांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या विधानांमध्ये आता स्पष्टपणे राजकीय वास येऊ लागला आहे. आगामी काळात ते 'रंग बदलणारे' म्हणून ओळखले जातील, असा घणाघात कदम यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जरांगे यांना भरपूर मदत केली होती आणि आताही ते उपमुख्यमंत्री असताना, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. असे असतानाही वारंवार बदलत चाललेल्या भूमिकेमुळे जरांगे यांच्या हेतूंवर शंका उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला दिमाखात सुरुवात झाली आहे. मेळाव्याची अधिकृत सुरुवात होण्यापूर्वी उपस्थितांमध्ये जोश भरण्यासाठी विविध मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. विशेषतः प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांच्या जोशपूर्ण पोवाड्यांनी आणि मराठी गीतांनी संपूर्ण नेस्को परिसर दुमदुमून गेला. नेत्यांच्या भाषणांपूर्वी पार पडलेल्या या सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमाने मेळाव्याच्या सुरुवातीलाच एकच उत्साह निर्माण केला असून, शिवसैनिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क आणि गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मेळाव्यांची तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान, शिवाजी पार्कात आलेल्या शिवसैनिकांनी राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. दुष्काळग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीवर प्रश्न उपस्थित करत, गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे मेळाव्यातून कार्यकर्त्यांना कोणती दिशा देणार आणि सरकारवर काय टीका करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विजयादशमीच्या निमित्ताने आज दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवर शिवसेना (उबाठा) पक्षाचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडत आहे.
यावेळी बोलताना रमेश कोरगावकर म्हणाले की, "आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची लोक आहोत आणि आज विजयादशमीच्या दिवशी आम्ही येथे विचारांचे सोनं लुटण्यासाठी आलो आहोत."
सध्या राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे होत असल्यावरून त्यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, "आता मेळावे खूप होतात, पण खरा मेळावा कोणता हे जनता ओळखते. आज अनेकजण तसे मेळावे घेत आहेत, मात्र आमची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारांशीच आहे."
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या मेळाव्यात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पंजाबी शिवसैनिकांची उपस्थिती. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत घडामोडींवर उघडपणे भाष्य केले.
"संजय राऊत यांच्यामुळे शिवसेना फुटली"
मेळाव्यात बोलताना पंजाबी शिवसैनिकांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. "संजय राऊत यांच्यामुळेच मुख्य शिवसेना फुटली," असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मेळाव्यात एकच चर्चा रंगली.
"मदतीसाठी पंजाबी सगळ्यात पुढे"
पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी फक्त आम्हाला हुकूम करावा, आम्ही कुठल्याही बांधावर (कामासाठी किंवा मदतीसाठी) जायला तयार आहोत. कोणालाही मदत करण्यासाठी आम्ही पंजाबी लोक नेहमी सगळ्यात पुढे असतो." एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या मेळाव्यात पंजाबमधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले.
विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. आजच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे, कारण शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवर (शिवतीर्थ) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. मात्र, मेळावा उद्धव ठाकरेंचा असला तरी, कार्यकर्त्यांनी थेट राज ठाकरेंसाठी साकडं घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
राज ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी अन् पोस्टर्स
मेळाव्यापूर्वी शिवतीर्थावर कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी तीव्र इच्छा व्यक्त करणारे पोस्टर्स आणि फलक परिसरात झळकले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तसेच, याच परिसरात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे पोस्टर्सही झळकल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये शिंदेंचे शक्तीप्रदर्शन
एक दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये पार पडत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला एकनाथ शिंदे या मेळाव्यात नेमके काय उत्तर देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या या दसऱ्याच्या राजकीय महासंग्रामात दोन्ही बाजूं कडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
यंदाच्या दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कवरील (शिवतीर्थ) शिवसेना (उबाठा) दसरा मेळाव्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची भाषणे होणार आहेत. या मेळाव्यात सुरुवातीला नितीन बानगुडे पाटील, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, आणि संजय राऊत यांची भाषणे पार पडणार असून, या मेळाव्याची सांगता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्य भाषणाने होणार आहे. या सर्व प्रमुख नेत्यांच्या भाषणांमधून महायुती सरकारवर कडक शब्दांत राजकीय हल्लाबोल केला जाण्याची दाट शक्यता आहे.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. मनीषा कायदे यांनी दादर येथील (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्यावर टीका करताना म्हटले की, दादरचा दसरा मेळावा म्हणजे केवळ अहंकार आणि नरेटिव्ह (Narrative) पसरवण्याचा प्रयत्न आहे, तर आपले मानून घेतलेला हा मेळावा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करण्यासाठी आहे.
यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावरही भाष्य केले. शासनाकडून मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असे सांगत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले की, मागण्या मान्य झाल्यानंतरही जरांगे-पाटील सध्या बितरल्यासारखे (नाराज किंवा आक्रमक होऊन) बोलत आहेत. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना उधाण आले आहे.
Goregaon Nesco Melava :गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये आणि उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नेस्को परिसर आणि मुख्य व्यासपीठाचा परिसर आकर्षक पोस्टर्स व बॅनर्सने सजवण्यात आला आहे. "गरिबांची साथ, मदतीचा हात, एकनाथ..." अशा ठळक टॅगलाईनसह महायुती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विविध लोककल्याणकारी कामांचा पाढा या पोस्टर्सच्या माध्यमातून वाचण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' तसेच त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याचे आणि योजनांचे बॅनर्स प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. या जोरदार पोस्टरबाजीच्या माध्यमातून शिंदे गटाकडून मेळाव्याच्या ठिकाणी मोठे शक्तीप्रदर्शन केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
Shivsena Dasara Melava LIVE: विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आज महाराष्ट्राच्या राजकारणात 'दसरा मेळाव्याचा' महासंग्राम पाहायला मिळत आहे. दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून, दुसरीकडे गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये महायुतीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हुंकार घुमणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार राजकीय हल्लाबोल केला जाण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक राजकीय रणसंग्रामातील प्रत्येक घडामोडी, महत्त्वाचे दावे आणि भाषणांचे सर्वात जलद व ताजं अपडेट्स वाचण्यासाठी जोडलेले राहा!
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.