राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
पावसामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबई, पुणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, रायगड, पालघर, रत्नागिरीसह १३ शहरांमध्ये आदेश लागू
हवामान खात्याने अनेक भागांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे
राज्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. आजचा दिवस देखील राज्यातील अनेक शहरं आणि जिल्ह्यांसाठी महत्वाचा असणार आहे कारण हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे शहारासह राज्यातील १३ शहरांमधील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनामार्फत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये, गरज असल्यास त्यांनी घराबाहेर पडावे अन्यथा घरीच राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.
मुंबई -
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी सोमवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला असून जोरदार वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुणे -
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्णय घेतला. मावळ आणि लोणावळा शहरातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आदेश जारी केले. लोणावळ्यातील अंगणवाडी, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक सर्व शाळांना आज सुट्टी असणार आहे.
उल्हासनगर -
प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ६ जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याचे जाहीर केल्यामुळे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला. अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पाणी साचणे व पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन आज महानगरपालिका हद्दीतील सर्व राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.पुढील परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कल्याण डोंबिवली-
अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून कल्याण- डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने आज महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले आहेत.
रत्नागिरी -
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले. रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहराला पुराचा धोका वाढला आहे. वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसामुळे जनजीवन विस्कळीत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई -
नवी मुंबईला देखील आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. या आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
रायगड -
रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तसेच अंगणवाड्याना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील २ दिवस पावसाचा हाय अलर्ट दिला आहे. या काळात जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
पालघर -
पालघर जिल्ह्यासह वसई विरार शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेता ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावर सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पालघर जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.