संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: देशभरात खळबळ उडवणाऱ्या सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या महादेव ऑनलाइन बेटिंग सिंडिकेट प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) मोठे यश मिळाले आहे. या बेकायदेशीर बेटिंग नेटवर्कचा कथित सूत्रधार आणि महादेव ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर याचे ओमानमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. सीबीआयने इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयाने ही कारवाई केली. सीबीआयचे विशेष पथक ओमानमध्ये जाऊन चंद्राकरला भारतात घेऊन आले. आता त्याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सौरभ चंद्राकर हा महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्कचा सहसंस्थापक रवी उप्पल याच्यासोबत या सिंडिकेटचे संचालन करत असल्याचा आरोप आहे. या दोघांनी मिळून ऑनलाइन बेटिंगचे मोठे नेटवर्क उभारले होते. २०१९ च्या आसपास हे दोघे दुबईला गेल्याचे सांगितले जाते. तेथून विविध ऑनलाइन बेटिंग ॲप्लिकेशन्स आणि वेबसाइटच्या माध्यमातून हे नेटवर्क सुरू ठेवल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. चंद्राकरला भारतात आणण्यासाठी यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात आले होते. इंटरपोलने जारी केलेल्या रेड नोटीसच्या आधारे ऑक्टोबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भारताने त्याच महिन्यात त्याच्या प्रत्यार्पणासाठी अधिकृत विनंती केली होती. मात्र, ही प्रत्यार्पण प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती.
दरम्यान, या प्रकरणातील चंद्राकरचा कथित साथीदार आणि सहसंस्थापक रवी उप्पल याच्याबाबतही तपास यंत्रणांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. यूएईने त्याच्याविरोधातील प्रत्यार्पण प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये तो बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते.
महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणात बेकायदेशीर सट्टेबाजी, मनी लाँडरिंग आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशांची उलाढाल केल्याचे गंभीर आरोप आहेत. या संपूर्ण नेटवर्कची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. चंद्राकरच्या भारतातील प्रत्यार्पणामुळे या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बेटिंग नेटवर्कचे संचालन आणि कथित सहभागी व्यक्तींच्या भूमिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आता रायपूर येथील विशेष न्यायालयातील सुनावणी आणि तपासादरम्यान कोणते नवे खुलासे होतात, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.