Radha Patil: पुण्यात दहीहंडी कार्यक्रमादरम्यान लावणी नृत्य सादर केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटील यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष आणि आयोजकांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमात अश्लील नृत्य सादर होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून काही नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. त्यानुसार कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, संबंधित कार्यक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. असे असतानाही कार्यक्रमाचे आयोजन करून लावणी सादर करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी लावणी नृत्यांगणा राधा पाटील (रा. मुंबई), एम्पायर ग्रुप ए के बॉइजचे अध्यक्ष भूषण अभिमान सोनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर भाग १, कात्रज) आणि आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष, आयोजक आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांकडून आवश्यक प्राधिकृत कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. परवानगी नसतानाही कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करताना आवश्यक परवानग्या आणि प्रमाणपत्रे घेण्याच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमांमध्ये अश्लील किंवा आक्षेपार्ह स्वरूपाचे सादरीकरण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जाते.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत. तपासादरम्यान कार्यक्रमाचे आयोजन, परवानगी आणि संबंधित कागदपत्रांबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.