विमाननगर परिसरातील कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये हल्लेखोर तरुणीवर निर्दयपणे चॉपरने वार करीत होता. त्यावेळी तेथे जमलेले नागरिक केवळ बघ्यांच्या भूमिकेत होते. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला अन॒ नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. निष्पाप तरुणीवर जीवघेणा हल्ला होताना बघ्यांची गर्दी पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याकांडाने पुण्यातील सदाशिव पेठेत घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. सदाशिव पेठेत ही अशीच थरकाप उडवून देणारी घटना घडली होती.
पुण्यातील शुभदा शंकर कोदारे हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरून सोडलंय. वाढत्या गुन्हेगारीवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्याचबरोबर मानवातील संपलेल्या माणुसकीवर प्रश्न उपस्थित होतोय. गुन्हेगार डोळ्या देखत गुन्हे करतोय पण निष्ठुर झालेला माणूस त्याचं चित्रिकरण करण्यात गुंग झालेला दिसतोय. त्यामुळे समाजातील माणुसकी संपली का? प्रश्न उपस्थित होत आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) ही तरुणी मंगळवारी (ता. ७) सायंकाळी डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली. त्यावेळी कृष्णा सत्यनारायण कनोजिया (वय २७, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) याने तिला पार्किंगमध्ये गाठले. त्याने तरुणीच्या उजव्या हातावर लोखंडी चॉपरने चार ते पाच वार केले. शुभदा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. हल्लेखोर तरुण हातात चॉपर घेऊन निर्लज्जपणे ताठ मानेने फिरत होता.
गंभीर जखमी झालेली शुभदा स्वत:चा जीव वाचविण्यासाठी मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी हल्लेखोराने तिच्याकडील मोबाईल हिसकावला आणि तिला ढकलून दिले. परंतु त्याठिकाणी जमलेल्या बघ्यांपैकी कोणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. हल्लेखोर आरोपीने त्याच्याकडील चॉपर काही वेळाने खाली टाकून दिला.
त्यानंतर काहीजणांनी हल्लेखोराला चोप दिला. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शुभदाला येरवड्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु जास्त रक्तस्राव झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस अशीच हादरवून सोडणारी घटना घडली होती. चौकीजवळ २७ जून २०२३ रोजी सकाळी एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथून जाणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघा तरुणांनी हल्लेखोराला अडवून तरुणीचा जीव वाचविला होता. मात्र विमाननगरमधील कंपनीत हल्लेखोर तरुणीवर चॉपरने वार करीत होता. त्यावेळी बघ्यांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे माणुसकी हरवली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.
प्रेमसंबंध सुरू ठेवण्यास नकार दिला म्हणून तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार करत तिला जिवे मारलं होतं. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे या आरोपीचं नाव आहे. प्रेमसंबंध संपविल्याच्या रागातून त्याने २७ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला केला होता.
शुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते. तरुणीच्या कंपनीतील सहकाऱ्याने पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने कनोजियाला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या बँक खात्याचा तपशील पडताळून पाहण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत तरुणीने कनोजियाकडून उधार घेतलेले पैसे परत केले नाहीत. त्यामुळे तिचा खून केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण कोणते, याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.