लोणी काळभोरमध्ये माजी सरपंच राहुल काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल
जगदंबा हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून नेमका काय वाद झाला?
पुण्यात हॉटेल मालक आणि कामगारांना मारहाण केल्याची घटना
सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
लोणी काळभोर येथील प्रसिद्ध 'जगदंबा' हॉटेलमध्ये जेवणाचे बिल दिल्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून माजी सरपंच राहुल काळभोर आणि त्याच्या साथीदारांनी तुफान राडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हॉटेल व्यावसायिक, त्यांचे कुटुंबिय आणि कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली असून, काचेचे भांडे फेकून मारल्याने फिर्यादी जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात राहुल दत्तात्रय काळभोरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस फिर्यादीनुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (एन्जेल हायस्कूलजवळ) येथील 'जगदंबा' हॉटेलमध्ये ही घटना घडली. हे हॉटेल मागील ३० वर्षांपासून राजेंद्र चौधरी (वय ५६) हे चालवत आहेत. घटनेच्या रात्री आरोपी रामचंद्र ऊर्फ रामभाऊ दत्तात्रय काळभोर हा जेवणासाठी हॉटेलमध्ये आला होता.
जेवण झाल्यानंतर त्याने ऑनलाईन बिल पे केले आणि "माझे बिल आले का?" अशी विचारणा केली. हॉटेल मालकाने "हो, तुमचे बिल जमा झाले आहे" असे सांगताच रामचंद्र काळभोर याने कोणतीही चिथावणी नसताना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वादाचा आवाज ऐकून राजेंद्र चौधरी यांचा मुलगा मयूर चौधरी (वय २२) तिथे आला. त्याने वाद सोडवण्याचा आणि रामचंद्र याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, रामचंद्रने त्यालाही शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केली. त्यानंतर मयूरने रामचंद्रला हॉटेलबाहेर काढले.
या घटनेनंतर काही मिनिटांतच रामचंद्रचा भाऊ आणि लोणी काळभोरचा माजी सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर हे बेकायदेशीरपणे हॉटेलमध्ये घुसले. आरोपींनी हॉटेल मालक राजेंद्र चौधरी आणि कामगारांवर हल्ला चढवला. मारहाणीदरम्यान आरोपी स्वप्निल काळभोर याने काउंटरवर ठेवलेले बडीशेपेचे काचेचे भांडे उचलून थेट राजेंद्र चौधरी यांच्या तोंडावर मारले. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या हॉटेलमधील ग्राहक दीपक कुकरेजा आणि कामगार मिराज ऊर्फ शमामुुल अन्सारी यांनाही आरोपींनी मारहाण केली.
या प्रकारानंतर मयूर चौधरी व त्याचा चुलत भाऊ ओम चौधरी हे घटनेची माहिती देण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेले. तक्रार देऊन ते हॉटेलकडे परत येत असताना, हॉटेलजवळच असलेल्या डॉमिनोज पिझ्झासमोर आरोपी राहुल काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांनी त्यांना पुन्हा गाठले. तिथेही आरोपींनी दोघांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करत मारहाण केली.