पुण्यात ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
तरुण-तरुणींना धमकावून पैसे उकळल्याचा आरोप
आयटी इंजिनिअरकडून पोलिस आयुक्तांकडे तक्रार
चौकशीनंतर आयुक्तांनी पोलिसांवर कारवाई केली
पुण्यातील ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. या पोलिसांनी तरुण-तरुणींना सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची भीती दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळले. या घटनेमुळे पुणे पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात हे ३ पोलिस कार्यरत आहेत. पोलिस हवालदार किरण अब्दागिरी, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली.
मध्यरात्री आयटी इंजिनिअर तरुण-तरुणींना पोलिस ठाण्यात आणून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत त्यांच्याकडून या पोलिसांनी १० हजार रुपये उकळले होते. फोन पेद्वारे त्यांनी हे पैसे घेतले होते. या प्रकरणी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर परिमंडळ सातचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी याबाबतचे आदेश दिले.
अब्दागिरे, खाडे आणि कांबळे हे तिघे पोलिस वाघोली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. २ एप्रिल रोजी खाडे आणि कांबळे हे दोघे वाघोली गावठाण बिट मार्शल म्हणून कर्तव्यावर होते. रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून कॉल आला की, वाघोलीतील एका सोसायटीत काही मुलं रुमवर राहतात आणि मुली आणून व्हिडीओ तयार करतात. या माहितीनंतर खाडे आणि कांबळे हे दोघे तेथे गेले. त्याठिकाणी त्यांनी एका २४ वर्षीय तरुणाला पोलिस ठाण्यात आणले. त्या रात्री ठाणे अंमलदार म्हणून अब्दागिरे हे कर्तव्यावर होते.
कॉलच्या अनुषंगाने जर असा काही प्रकार होता तर योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे होते. मात्र तिघांनी अशी कोणतीच कार्यवाही केली नाही. अब्दागिरे यांनी तरुण-तरुणीला तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो, तुमची नोकरी घालवतो, नातेवाईकांना बोलावून घेतो अशा धमक्या दिल्या. तर खाडेने तरुणाला मारहाण केली. कांबळेने तरुणाच्या मैत्रीणीला बराच वेळ पोलिस ठाण्यात उभे ठेवले. हा प्रकार मिटवून घेण्यासाठी तिन्ही पोलिसांनी तरुणांकडे १० हजार रुपयांची मागणी केली. खाडेने त्याच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्कॅनरवर १० हजार रुपये घेतले. हे स्कॅनर ओंकार ॲटो गॅरेज नावाने होते.
पोलिसांच्या वर्तनाबद्दल तरुणाला संशय आला होता. त्याने या प्रकाराबाबत सविस्तर चौकशी केली. त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, तिन्ही पोलिसांनी पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला आहे. त्यानंतर आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीत या तिघा पोलिसांचा रात्रीचा कारनामा समोर आला. त्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. या प्रकरणात तिघे दोषी आढळल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.