अख्ख्या जूनमध्ये ओढ घेतलेल्या पावसानं जुलैमध्ये सगळी कसर भरून काढली आणि मुंबईकरांवर कोसळणारं पाणीकपातीचं संकट तूर्तास टळलं. जूनमध्येही पाऊस न पडल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता. मात्र, जुलैमध्ये दमदार पाऊस पडला आणि मुंबईकरांचा जीवही भांड्यात पडला. ही धरणं काठोकाठ भरली आहेत.
मागील वर्षी मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत एक ते दोन वेळा पूरस्थिती निर्माण करणाऱ्या पावसानं यंदा जूनमध्येच दांडी मारली. जूनच्या सुरुवातीलाच धो-धो बरसणारा पाऊस रुसला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही लपाछपी सुरूच होती. दुसरीकडे 'एल निनो'च्या प्रभावामुळं यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईसह राज्यभरात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होईल, असाही अंदाज होता. तो जूनच्या सुरुवातीलाच खरा ठरला होता. जूनमध्ये पावसाने ओढ दिली. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांनी तळ गाठला होता. मुंबई महापालिकेने पाणीकपात जाहीर केली होती. त्यात जूनमध्ये पाऊस न पडल्याने मुंबईकरांचं टेन्शन वाढलं होतं. जुलैमध्ये वरुणराजाची कृपादृष्टी झाली आणि मुंबईसह धरणक्षेत्रांतही पावसानं जोरदार हजेरी लावली. जुलैमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने कोरडी धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळं आता मुंबईवरचं पाणीकपातीचं संकट टळू शकतं. तसा निर्णय महापालिकेकडून घेतला जाऊ शकतो.
मे महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटांनी सगळेच हैराण झाले होते. जूनमध्ये पाऊस पडून हवामानात गारवा पसरेल, असे वाटत असताना पावसानं विश्रांतीचा काळ वाढवला. संपूर्ण महिना पावसानं दडी मारली. त्यामुळं पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसू लागल्या. मुंबईसह आसपासची उपनगरं पाणीकपातीचा सामना करू लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तर तळ गाठला होता. याशिवाय एल निनोच्या प्रभावामुळं यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज होता. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने 15 मेपासूनच पाणीकपात सुरू केली होती. मात्र जुलैमध्ये पडलेल्या पावसामुळं संपूर्ण चित्र बदललं आहे.
जुलै महिन्यात मुंबई आणि महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पडला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली दिसून आली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा,मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडकसागर, विहार, तुलसी या धरणांची पाणी साठवणूक क्षमता एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर आहे. सध्या या धरणांत 12 लाख 89 हजार 289 दशलक्ष लीटर म्हणजेच 89.8 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांतील सध्याच्या पाणीसाठ्याचा विचार करता आतापर्यंत गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याची नोंद झाली आहे.
मुंबईला या धरणांमधून दररोज सुमारे 4000 दशलक्ष इतका पाणीपुरवठा केला जातो. धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने आगामी काळात मुंबई महापालिका पाणीकपातीचा निर्णय मागे घेऊ शकते , अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे पावसानं काही काळ ब्रेक घेतल्यानं पाणीकपात मागे घेण्याच्या संदर्भात महापालिका प्रशासन नेमका काय निर्णय घेतं, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.