विरार पश्चिमेतील नारंगी गावात धक्कादायक घटना
घरगुती वादादरम्यान सासऱ्याच्या धक्क्याने पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
बोळींज पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली
आरोपीविरोधात बीएनएस कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल
विरार पश्चिमेतील नारंगी गावात घरगुती वादातून दुर्दैवी घटना घडली. सासऱ्याने दिलेल्या धक्क्यामुळे खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोळींज पोलिसांनी आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.
प्राची कल्पेश पाटील (वय २८) असे मृत विवाहितेचे नाव असून ती विरार पश्चिमेतील नारंगी गावातील भगत आळी येथे पती व सासरच्या कुटुंबीयांसमवेत राहत होती. तिच्या पश्चात आठ महिन्यांची मुलगी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी प्राची पाटील आणि तिचे सासरे गणपत पाटील यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. सासरे शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्राचीचा भाऊ विशाल पाटील हा तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी आला होता.
यावेळी प्राचीची आठ महिन्यांची मुलगी गणपत पाटील यांच्या खांद्यावर होती. मुलीला ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यावेळी गणपत पाटील यांनी प्राचीला जोराचा धक्का दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे ती खाली पडून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी बोळींज पोलिस ठाण्यात गणपत पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नारंगी गाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.