संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी
Mumbai police constable Vijay Bagul death news : आजारपण आणि असह्य शारीरिक वेदनांमुळे मानसिक नैराश्यात गेलेल्या मुंबई पोलीस दलातील एका शिपायाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजय बागुल यांनी १० नोव्हेंबर रोजी कुर्ला येथील नेहरूनगर पोलीस वसाहतीतील राहत्या घरी जीवन संपवले. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विजय बागुल हे मूळचे नाशिकचे रहिवासी होते. २००९ मध्ये ते मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून रुजू झाले होते आणि गेल्या चार वर्षांपासून दिंडोशी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही काळापूर्वी त्यांच्या पायाला अंतर्गत दुखापत झाली होती, ज्यावर उपचारही सुरू होते. मात्र, उपचार करूनही पायातील वेदना कमी होत नसल्याने ते प्रचंड त्रस्त झाले होते. या सततच्या त्रासामुळे ते मानसिक नैराश्यात गेल्याची माहिती समोर आली आहे.
याच नैराश्यातून त्यांनी मंगळवारी (१० नोव्हेंबर) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच स्थानिक रहिवाशांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, विजय बागुल यांच्या पार्थिवावर नाशिक येथील त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी कोमल, दहा वर्षांचा मुलगा यश आणि सहा वर्षांची मुलगी श्रावणी असा परिवार आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने या दोन्ही चिमुकल्यांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
पोलीस दलात अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या विजय बागुल यांच्या अशा अकाली जाण्याने सहकारी आणि परिचितांकडून शोक व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शारीरिक व्याधींमधून निर्माण होणाऱ्या मानसिक तणावाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.