दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
ठाणे, दादर, कल्याण आणि कुर्ला रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. ट्रेनची वाट पाहताना मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. अगदी आठवडाभरापूर्वी मुंबईत सलग तीन दिवस जोरदार पाऊस झाला होता.
या पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक देखील पूर्णत: विस्कळीत झाली होती.
आज शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबईत मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दादर, हिंदमाता परेल, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, वर्सोवा, मालाड, कांदिवली बोरिवली या भागात पहाटेपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक सखल भागात आता पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे
त्यामुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे नवी मुंबईत देखील जोरदार पाऊस सुरू झाला आहे. कालपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा शुक्रवारी पहाटे जोर वाढला आहे. त्यामुळे हार्बर लाईनवरील वाहतूक देखील विस्कळीत झाल्याची माहिती आहे.
हार्बरवरील लोकल ट्रेन देखील १० ते १५ मिनिटांनी उशिरा धावत आहे. दरम्यान, आजपासून मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढणार, असा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईकरांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.