संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई: कांदिवली पूर्व परिसरात रस्त्यावर ऑइल सांडल्याने अपघातांची मालिका घडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावर तब्बल १४ दुचाकींचे अपघात झाले. रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे दुचाकी घसरून हे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व येथील उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावर ऑइल सांडले होते. या ऑइलवरून दुचाकी घसरल्याने एकापाठोपाठ एक अपघात घडले. अवघ्या काही वेळात तब्बल १४ दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक दुचाकी घसरू लागल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रस्त्यावर सांडलेले ऑइल तातडीने हटवून वाहतूक सुरक्षित करण्याची गरज आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवैध पार्किंगचा विळखा असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. रात्री दोन वाजेपर्यंत खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि दुकाने सुरू राहत असल्याने रस्त्यावर गर्दी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून स्थानिकांच्या शांततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलभोवती भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याची तक्रार आहे. याच परिसरात दोन ते तीन नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा दावाही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.