वरळीतील एका स्पामध्ये आरटीआय कार्यकर्ता आणि पोलिसांचा खबरी गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणात पोलिसांनी स्पा मालकासह ३ जणांना अटक केली आहे. गुरू वाघमारेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली. दोन कथित हल्लेखोरांपैकी एकाने गुटखा खरेदी करण्यासाठी ७० रुपयांचे यूपीआय पेमेंट केले होते. यावरूनच पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली. स्पावर छापा टाकण्याची आणि आरटीआय अर्ज दाखल करेल अशी धमकी गुरू वाघमारे स्पा मालकाला देत होता. यामुळेच स्पा मालकाने त्याची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे.
संतोष शेरकर असे अटक करण्यात आलेल्या स्पा मालकाचे नाव आहे. या स्पा मालकाला वरळी पोलिसांनी अटक केली. तसेच मुंबई गुन्हे शाखेने मोहम्मद फिरोज अन्सारी याला नालासोपारा येथून अटक केली. तर दिल्लीचा साकीब अन्सारी आणि इतर दोघांना राजस्थानच्या कोटा येथून ताब्यात घेण्यात आले होते. फिरोज अन्सारीच्या स्पावर मागच्या वर्षी पोलिसांनी छापा टाकत तो बंद केला होता आणि वरळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्याला गुरू वाघमारेवर राग होता.
विलेपार्ले येथे राहणारा गुरू वाघमारे उर्फ चुलबुल पांडे याची २३ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास वरळीतील स्पामध्ये हत्या करण्यात आली होती. गुरू आपल्या २१ वर्षीय गलफ्रेंडसोबत या स्पा पार्लरमध्ये गेला होता. तो नेहमीच या स्पामध्ये जायचा. स्पामध्ये गुरू आपल्या गर्लफ्रेंडसोबत असताना दोन जणांनी स्पामध्ये घुसून मध्यरात्री अडीचच्या सुमारास गळा चिरून निर्घृणपण त्याची हत्या केली होती. गुरू वाघमारेच्या मांडीवर २२ नावांचे टॅटू पोलिसांना दिसून आले होते. यावर आरोपींची नावं लिहिली होती. गुरूची हत्या केल्यानंतर हे दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
दोन्ही हल्लेखोरांनी गुरू वाघमारेची गाडी सायन बारमधून स्पामध्ये नेली होती. सायन बारजवळ असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे दोन्ही हल्लेखोर कैद झाले होते. या हल्लेखोरांनी रेनेकोट घातले होते. यामधील एका हल्लेखोराने पानाच्या टपरीवर जाऊन गुटखा खरेदी केला होता. त्यासाठी त्याने ऑनलाइन पेमेंट केले होते. यावरून पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला. त्यानंतर पोलिसांना आरोपीच्या या मोबाईल नंबरवरून इतर आरोपींचे नंबर मिळाले. यामध्ये एक फिरोजचा नंबर निघाला. त्याच्या कॉल डेटावरून तो शेरकरच्या संपर्कात असल्याचे आढळून आले.
गुरू वाघमारे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील स्पा मालकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याने त्याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संतोष शेरेकर, फिरोझ अन्सारी आणि शाकीब अन्सारी या तिघांना पोलिसांनी अटक केली. ४ लाख रुपयांची सुपारी देऊन गुरू वाघामारेची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. गुरू वाघमारेने अनेक स्पा मालकांना पोलिसांच्या छाप्याच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे तपासून उघड झाले. गुरू वाघमारे हा हिस्ट्रीशीटर होता. त्याच्यावर बलात्कार, धमकी देणे आणि हत्येचा प्रयत्न यासारखे १० गंभीर गुन्हे दाखल झाले होते. गुरू स्वत:ला पोलिसांचा खबरी आणि आरटीआय कार्यकर्ता असल्याचे सांगायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.