पुढील ३-४ महिन्यात देशात काहीतरी मोठी गडबड होईल, देश रस्त्यावर उतरला तर मला आश्चर्य वाटणार नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले. ते मुंबईत प्रेस क्लबमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आरएसएस, भाजप सरकार सडकून टीका केला.
निवडणुकीत पूर्ण पारदर्शकता हवी असेल तर देशात ईव्हीएमऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली. भारताशेजारील बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानसह जगातील इतर देशांमध्ये बॅलेट पेपरद्वारे मतदान घेतले जात असताना, भारतातच ईव्हीएमचा अट्टाहास का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढच्या ४-५ महिन्यांत देशात मोठी घडामोड घडणार
देशाच्या आगामी राजकारणाबाबत भाष्य करताना राज ठाकरे यांनी मोठा अंदाज वर्तवला आहे. येत्या ३ ते ४ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड किंवा मोठी राजकीय घडामोड घडल्याचे पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. तसेच, येत्या काही महिन्यांत देशातील जनता रस्त्यावर उतरली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. देशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता, एक काळ असा येईल की देशात पंतप्रधानच असणार नाही, असे वक्तव्यही त्यांनी या वेळी केले.
EVM वरून केंद्र सरकारवर निशाणा
भारतातील निवडणूक प्रक्रियेवरही राज ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, २०१८ पासून मी देशात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याबाबत सातत्याने बोलत आहे, आणि आता लोकांनाही ते पटू लागले आहे. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केल्यानंतर निकाल लवकर मिळतो खरा, पण मतदारांना समाधान मिळत नाही. बॅलेट पेपरवर मतदान करताना आपण नक्की कोणत्या व्यक्तीला मत दिले आहे, याचे मनापासून समाधान मिळते. पूर्वी १९९५ मध्ये निवडणुकीचे निकाल एक महिन्याने लागत असत, त्यामुळे काय फरक पडतो? निवडणुकीचा निकाल यायला ४ दिवस जास्त लागले तरी चालतील, कोणाला घाई आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, आफ्रिकेतील मोजके ३-४ देश सोडले, तर संपूर्ण जगभरात बॅलेट पेपरवरच मतदान होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी राजकीय चिखलफेकीवर भाष्य करत, हार-जित हा राजकारणाचा विषय बाजूला ठेवावा, असे मत मांडले. तसेच, संविधानानुसार वाटणारी भीती आणि नागरिकांच्या मनात निवडणुकीच्या विश्वासार्हतेबद्दल निर्माण झालेला संशय दूर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. संजय राऊतांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा एकदा पुनरावृत्ती केली की, आगामी काळात देशात मोठे राजकीय फेरबदल पाहायला मिळतील.
आणखी अनेकांची प्रकरणे आणि सत्ये समोर येणार असून हा सिलसिला थांबणार नाही. लोकांच्या मनात असलेला तीव्र राग पाहता, येत्या काही महिन्यांत अख्खा देश रस्त्यावर उतरला तरी नवल वाटायला नको. देशात NEET सह अनेक आंदोलने झाली. मात्र, ही सर्व आंदोलने फक्त पेपरफुटीपुरती मर्यादित नव्हती, तर त्यामागे लोकांचा सखोल राग आणि असंतोष होता, असे राज ठाकरे म्हणाले.
शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांना आणि मुलांवर गणवेशधारी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि मारहाण केली. भाजप आपले जुने दिवस विसरली आहे का? असा सवाल त्यांनी केला. अमेरिकेत लोकशाही आहे, तिथे लोक थेट राष्ट्राध्यक्षांना (उदा. ट्रम्प) भेटून बोलतात आणि त्यांच्यावर किंवा त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला जात नाही. मात्र, भारतात समीर भाटिया यांनी गौतम अदानी यांच्यावर डॉक्युमेंट्री केल्यावर ती युट्यूबवरून काढण्यासाठी सरकारकडून दबाव टाकला जातो असे राज ठाकरे म्हणाले.
सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन आलेले नाही. भाजपने मंजूर केलेल्या गोष्टींकडेच नेहमी बिचाऱ्यासारखे बघायचे का? आज आपण घेतलेली भूमिका भविष्यात चुकीचे पायंडे पाडत नाहीये ना, याचा विचार करायला हवा असे राज ठाकरे म्हणाले. देशातील संस्था स्वायत्त उरलेल्या नाहीत. सीजेपी (CJP) मधील दोघांना अटक झाल्याचा संदर्भ देत, न्यायव्यवस्था नेमके कसले निकाल देत आहे, याचा सुप्रीम कोर्टाने विचार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बदल घडवणे हे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हातात नसून तो जनतेच्या हातात आहे. २०१४ मध्ये आलेली सत्ता ही पूर्णपणे नरेंद्र मोदी यांच्यामुळे आली होती, मोहन भागवत यांच्यामुळे नाही. "ती सत्ता आमच्यामुळे आली," असा कोणताही गैरसमज भाजपने करून घेऊ नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.