रश्मी पुराणिक
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मराठी भाषेतच कार्यक्रम प्रसारित करण्यात यावेत,अशी आग्रही मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. याबाबत एक पत्र राज ठाकरे यांनी दूरदर्शनला लिहिलं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्रानंतर सह्याद्री वाहिनी काय भूमिका घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray News In Marathi )
राज ठाकरे यांनी दूरर्दशनला लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमासह इतरही कार्यक्रमाचा उल्लेख केला आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावे, अशी मनसेची मुख्य मागणी आहे.
राज ठाकरे म्हणतात, 'दूरदर्शनने (आत्ताचे प्रसार भारती) दि. १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सहयाद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली, त्याचा उद्देश हा महाराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्हावे हा आहे. परंतु सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचे प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्व सामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या. तसेच याबाबत महाराष्ट्र टाइम्स सारख्या अग्रगण्य मराठी दैनिकाने माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती घेतली असता त्यात ही बाब उघड झाली. तश्या प्रकारच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा 'मन की बात' हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सहयाद्री तसंच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून दाखवला जातो आणि त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. पण कोशिश से कामयाबी तक, 'तराने पुराने' हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सहयाद्री वाहिनीवर दाखवले जातात आणि ते पुनः प्रसारीतही केले जात आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरून नाही.
आम्ही आपणांस एवढंच सांगू इच्छितो की, यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रमः मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्र राज्यात आहेत, त्यामुळे मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचे भान सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. याबाबत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील दूरदर्शनच्या स्थानिक राजभाषाप्रेमी आणि आग्रही अशा प्रादेशिक वाहिन्यांकडून आपण योग्य तो बोध घ्यावा व सह्याद्री वाहिनीवर होणारा इतर भाषांचा प्रादुर्भाव वेळेत रोखावा, हीच एकमेव अपेक्षा.
आमच्या मागणीचा आपण जरूर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.