स्‍मृतिभ्रंश आजारावरील उपचारांसाठी KEM रुग्‍णालयात सुरु झाले मेमरी क्‍ल‍िन‍िक सुमित सावंत
मुंबई/पुणे

स्‍मृतिभ्रंश आजारावरील उपचारांसाठी KEM रुग्‍णालयात सुरु झाले मेमरी क्‍ल‍िन‍िक

एखाद्या गोष्‍टीचे विस्‍मरण होणे प्रत्‍येकाच्‍या बाबतीत घडते. मात्र, सतत विस्‍मरण होणे म्‍हणजे स्‍मृती शक्‍ती कमी होत जाणे, त्‍यातून दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होणे हा स्‍मृतिभ्रंश आजार आहे. त्‍यास डिमेन्‍श‍िया किंवा अल्‍झायमर या नावानेही ओळखले जाते.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्‍मृतिभ्रंश (Alzheimer) अर्थात सातत्‍याने विस्‍मरण होण्‍याचा आजार जडलेल्‍या रुग्‍णांवरील वैद्यकीय उपचारांसाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या राजे एडवर्ड स्‍मारक रुग्‍णालय (के. ई. एम. हॉस्‍प‍िटल) मध्‍ये मेमरी क्‍ल‍िन‍िक सुरु करण्‍यात आले आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांच्‍या हस्‍ते या वैद्यकीय सेवेचे लोकार्पण करण्‍यात आले. सध्‍या बाह्य रुग्‍णसेवा (ओपीडी) तत्‍त्‍वावर ही उपचार पद्धती उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. भविष्‍यात त्‍याचे काळजी केंद्र (डे केअर सेंटर) मध्‍ये रुपांतर करण्‍याचे नियोजन असल्‍याची माहिती या लोकार्पण प्रसंगी श्री. सुरेश काकाणी यांनी दिली. यावेळी केईएम रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. हेमंत देशमुख, विभागप्रमुख डॉ. संगीता रावत व इतर मान्‍यवर उपस्थित होते.

एखाद्या गोष्‍टीचे विस्‍मरण होणे प्रत्‍येकाच्‍या बाबतीत घडते. मात्र, सतत विस्‍मरण होणे म्‍हणजे स्‍मृती शक्‍ती कमी होत जाणे, त्‍यातून दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण होणे हा स्‍मृतिभ्रंश आजार आहे. त्‍यास डिमेन्‍श‍िया किंवा अल्‍झायमर या नावानेही ओळखले जाते. मेंदूतील संरचनेमध्‍ये झालेल्‍या बदलामुळे हा आजार होऊ शकतो. प्रामुख्‍याने वाढत्‍या वयामध्‍ये हा आजार दिसून येतो. महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे, नवीन माहिती प्राप्‍त करता न येणे, नावे लक्षात ठेवताना किंवा शब्द आठवण्‍यात अडचण येणे, सतत विस्‍मरण होवून दैनंदिन कामांमध्ये गैरसोय होणे, वागणूक किंवा व्यक्तिमत्वात बदल होणे, दैनंदिन ओळखीच्या परिसरातही हरवणे आणि अशी साधर्म्‍य दाखवणारी इतर लक्षणे दिसू लागतात. यातून व्‍यक्‍ती म्‍हणून कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय येऊ लागतात. असे लक्षणीय बदल होऊन बिघडत जाणारे दैनंदिन जीवन किंवा कामकाज हे चिंताजनक ठरू लागते.

हे देखील पहा :

स्‍मृति‍भ्रंश हा आजार मेंदूवर परिणाम करणाऱया रोगांमुळे होऊ शकतो. काही अपवादात्‍मक प्रसंगी पौष्टिक आहार किंवा जीवनसत्त्वाची कमतरता, अंतःस्रावी विकार, इलेक्ट्रोलाइट असंतुलन, संक्रमण, औषधांचा विपरित परिणाम किंवा मानसशास्त्रीय परिस्थिती यासारख्या घटकांमुळे देखील हा आजार जडण्‍याची शक्‍यता असते. या आजाराचे एकूण स्‍वरुप पाहता, वृद्धत्‍वाकडे झुकलेल्‍या वयोगटामध्‍ये बहुतांशी स्‍मृतिभ्रंश आढळून येतो. अनेक स्‍तरावर या आजाराविषयी संशोधन सुरु असले तरी तो पूर्ण बरा करु शकेल, असे उपचार अजून उपलब्‍ध झालेले नाहीत. असे असले तरी, या आजाराची लक्षणे दिसू लागताच वेळीच योग्‍य औषधोपचार व काळजी याआधारे नियंत्रित करता येतो.

भारतामध्‍ये एकूण लोकसंख्येच्या सुमारे १० टक्‍के नागरिक हे वृद्ध (६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे) आहेत. महाराष्‍ट्रात अंदाजे ५ लाख २७ हजार वृद्ध नागरिक हे स्मृतिभ्रंशाने ग्रस्‍त आहेत. वाढत्या आयुर्मानामुळे, स्‍मृतिभ्रंश ग्रस्‍त रुग्णांची संख्या सन २०३० पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्‍वाभाविकच स्‍मृतिभ्रंशाचे वाढते प्रमाण हे वृद्ध रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील त्रासदायक ठरु लागते. त्‍यातच, स्मृतिभ्रंश आजार आणि त्‍याच्‍या रुग्‍णांना समजून घेण्यासाठी, अशा रुग्‍णांवर करावयाचे वैद्यकीय उपचार व त्‍यांची काळजी याबाबतच्‍या सामाजिक जाणीवेमध्‍ये मोठी कमतरता आढळून येते.

या सर्व बाबी लक्षात घेता, बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने परळ स्थित राजे एडवर्ड स्‍मारक (केईएम) रुग्‍णालयात मेमरी क्लिनिक सुरु केले आहे. या केंद्रामध्‍ये स्‍मृतिभ्रंश ग्रस्‍त रुग्‍णांवर बाह्य सेवा तत्‍वावर उपचार करता येणे शक्‍य होणार आहे. सदर मेमरी क्‍ल‍िन‍िक हे औषधोपचार देण्‍यासह स्‍मृतिभ्रंशावरील उपचारासाठी इतर वैद्यकीय पद्धतींचा अवलंब देखील करणार आहे. म्‍हणजेच ते बहु उपचार पद्धती (मल्टीडिसीप्लिनरी) असणारे तज्ज्ञ केंद्र आहे. याठ‍िकाणी रुग्ण तसेच त्‍यांची काळजी घेणाऱ्यांना मनोवैज्ञानिक सहाय्य मिळेल. रुग्‍णांसाठी औषधोपचार, मानसोपचार, संज्ञानात्मक पुनर्वसन यासारख्या वैद्यकीय सेवा पुरवल्‍या जातील. स्मृतिभ्रंशांच्या रुग्‍णांना एकाच ठ‍िकाणी सर्व वैद्यकीय सेवा मिळाव्‍यात यादृष्‍ट‍िने त्‍याचे योग्‍य निदान, मूल्यमापन आणि व्यवस्थापन हे सर्व या मेमरी क्‍ल‍िन‍िक मधून उपलब्‍ध करुन दिले जाणार आहे. केईएम रुग्‍णालयाच्‍या मेंदूविकारशास्‍त्र विभागाद्वारे हे क्‍ल‍िन‍िक सुरु करण्‍यात आले आहे.

स्मृतिभ्रंश आजारावर उपचारासाठी अनेक पद्धती चाचणीच्या अवस्थेत असल्या तरी त्‍यावर खात्रीशीर इलाज अद्याप उपलब्‍ध नाही. म्हणून सद्यस्थितीत रुग्‍णावर सहाय्यकारी असे उपचार करणे, हाच मुख्य आधार आहे. स्मृतिभ्रंश ग्रस्‍त रुग्‍णांच्‍या बाबतीत, संज्ञानात्मक पुनर्वसन आणि काळजीवाहू सहाय्य हे दुर्लक्षित पैलू आहेत. त्‍यामधील अंतर दूर करुन जागृती घडवणे हे या केंद्राचे मुख्‍य ध्येय आहे. संज्ञानात्मक पुनर्वसन म्‍हणजे असा दृष्टिकोन की ज्यामध्ये रुग्ण आणि त्‍यांच्‍या कुटुंबाच्या गरजानुरुप कार्यक्रम आखून दिला जातो. रुग्‍णाचे दैनंदिन जीवन सुसह्य व अनुकूल होईल, अशा पूरक कृती सांगितल्‍या जातात. संबंधित कुटुंबाचे समुपदेशन केले जाते. दैनंदिन जीवन अनुकूल होण्यासाठी संपूर्ण योजना तयार करुन दिली जाते. स्मृतिभ्रंश क्षेत्रातील अग्रगण्य संशोधकांचे म्‍हणणे आहे की, रुग्‍णांची कार्यक्षमता राखण्यासाठी आणि/किंवा ती सुधारण्यासाठी अशा प्रकारचे संज्ञानात्‍मक पुनर्वसन हे प्रभावी ठरते.

केईएम रुग्‍णालयातील या मेमरी क्‍ल‍िन‍िकमध्‍ये प्रारंभी बाह्यरुग्ण सेवा दिली जाणार आहे. भविष्यात डे केअर सेंटर (काळजी केंद्र) सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. जेणेकरुन, डे केअर सेंटरमध्‍ये येणाऱ्या रुग्णांची दिवसभर काळजी घेतली जाईल व त्‍यांचे काळजीवाहक नातेवाईक/ परिचित/ स्‍नेही हे दिवसभरात आपली दिनचर्या व्‍यतीत करु शकतील. एकूणच, स्‍मृतिभ्रंश ग्रस्‍त रुग्‍णांची, त्‍यांच्‍या कुटुंबाची कार्यक्षमता सुधारणे आणि रुग्णांचे जीवनमान वाढवणे, या दिशेने महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सांगलीत जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

Sunil Tatkare: खरी राष्ट्रवादी कोणती? अखेर जनतेनं उत्तर दिलचं, सुनिल तटकरेची प्रतिक्रिया

Vidhan Sabha Election Result : अकोल्यात बंडखोरीचा भाजपला फटका; काँग्रेसचे साजिद खान पठाण विजयी

SCROLL FOR NEXT