शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथच्या मुख्याधिकाऱ्यांना भरसभेत झापले. शहरातील अस्वच्छतेवरून खासदार श्रीकांत शिंदे मुख्याधिकाऱ्यांवर भडकले. यावेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना देखील खडेबोल सुनावले. आता मला विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागेल, असा इशारा यावेळी श्रीकांत शिंदे यांनी सर्वांना दिला.
अंबरनाथ शहरातील अस्वच्छतेवरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे चांगलेच भडकल्याचं आज पाहायला मिळालं. याच मुद्द्यावरून त्यांनी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनाही दोन वेळा भर सभेत झापलं. मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर खासदारांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. नेताजी सुभाषचंद्र बोस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या लोकार्पणासाठी आज खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी उल्हासनगर शहरात रस्ते स्वच्छ होते, पण अंबरनाथमध्ये प्रवेश करताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घाण पडलेली होती, असं म्हणत त्यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
'अंबरनाथमध्ये आपण सिमेंटचे रस्ते बांधले आहेत. पण या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला घाण आहे, असं म्हणत शहरात फिरत जा.', असा उपहासात्मक सल्ला त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला. नागरिकांना वॉटर, गटर, मीटर याच्यापालिकडे चांगल्या सुविधा आपण देत असून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठे प्रकल्प होत असलेली अंबरनाथ ही एकमेव नगरपालिका आहे, मात्र हे होत असताना शहर स्वच्छ ठेवणं ही तुमची ड्युटी असून तुम्ही तुमचं काम केलं नाही, तर मला आणि नागरिकांना विरोधी पक्षाची भूमिका बजावावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं.
मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडे दोन चार्ज असल्यानं ते अंबरनाथला कमी येत असल्याची तक्रार अनेकदा समोर आली आहे. त्यामुळं आता खासदार श्रीकांत शिंदे हे या निमित्तानं शहराच्या हितासाठी काय निर्णय घेतात, हे आता पाहावं लागणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी मुख्याधिकाऱ्यांना भरसभेत झापले याची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.