संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत नागरिकांना सुरळीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधील उपकरणांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. याच पार्श्वभूमीवर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रांतर्गत येणाऱ्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची तातडीची देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजेच सलग १८ तास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या १८ तासांच्या मेगा शटडाउनमुळे कल्याण शहर, डोंबिवली शहर तसेच कल्याण ग्रामीण विभागातील विविध भागांवर याचा थेट परिणाम होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम तसेच कल्याण ग्रामीणमधील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील इतर गावांचा समावेश आहे. पाणीपुरवठा अचानक आणि एवढ्या दीर्घ काळासाठी बंद राहणार असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जलशुद्धीकरण केंद्रांची दुरुस्ती ही सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी दिवसभर नळ येणार नसल्याने संबंधित परिसरातील नागरिकांनी सोमवार संध्याकाळपासूनच आवश्यकतेनुसार पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा, जेणेकरून ऐन वेळी पाण्याचा अपुरा पडणारा पुरवठा टाळता येईल.
तसेच, दुरुस्तीचे काम ठरलेल्या वेळेत रात्री १२ वाजेपर्यंत संपल्यानंतरही पुढील काही तास जलवाहिन्यांमध्ये पाणी भरण्यास आणि दाब निर्माण होण्यास काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे बुधवार सकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना झालेल्या या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत सर्वांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि पाण्याचा वापर मोजक्याच प्रमाणात करण्याचे नमूद करत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.