डोंबिवलीत शिंदे गटाचा भाजपला मोठा धक्का
माजी स्थायी समिती सभापतींचा शिवसेनेत प्रवेश
शेकडो कार्यकर्त्यांनीही हाती घेतलं धनुष्यबाण
संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली | साम टीव्ही
Kalyan - Dombivli Politics News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग जोरात सुरू आहे. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांनंतर महापालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीमध्येही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दिपेश म्हात्रेंच्या रुपानं भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला दणका दिलेला असतानाच, दुसरीकडं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला झटका दिला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यालाच शिंदेंनी गळाला लावला आहे.
आगामी काळात कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष एकत्रित निवडणूक लढणार की स्वबळावर लढणार, याबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही. स्थानिक पातळीवर शिंदे यांची शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढण्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी मित्रपक्ष असलेल्या भाजपलाच जोरदार दणका दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. ठाणे येथे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आणि शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं.
भाजपमधील स्थानिक वाद, प्रभागातील विकासकामांबाबतची नाराजी आणि निधी अभावी प्रभागातील कामे ठप्प असल्याने म्हात्रे यांनी अखेर शिंदेंच्या सेनेचा झेंडा हाती घेतला. प्रभागाचा विकास होणे महत्त्वाचे आहे. जो पक्ष त्यासाठी निधी उपलब्ध करून देईल, त्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला, असे विकास म्हात्रे यांनी सांगितले.
विकास म्हात्रे यांच्या प्रवेशामुळे डोंबिवलीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर शिंदे गटाला मोठे बळ मिळणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे शिंदे गटाचे डोंबिवलीतील बळ अधिक वाढणार असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण तयार होत असल्याने डोंबिवलीतील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.