अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण : कल्याणमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. कल्याण पूर्व मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमधील वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजपला डिवचणारे बॅनर लावले आहेत. मागील महिन्याभरापासून शिंदे गटाचे पदाधिकारी बॅनरच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या भाजप आणि आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष्य करत आहेत.
कल्याण पूर्व मतदारसंघावर भाजपसह शिंदे गटाने देखील दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये वाद निर्माण होण्याचे शक्यता आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार गणपत गायकवाड आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच वाट्याला येईल, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील या मतदारसंघावर दावा करत ही जागा आमच्या वाटायला यावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे.
शिंदे गटाचे पदाधिकारी विशाल पावशे यांनी कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात पुन्हा भाजप आमदार गणपत गायकवाड यांना डिवचणारे बॅनर लावले आहेत. "काय हवंय? घाला गुन्हेगारीला आळा, लावा फ्री केबलला टाळा, अशा आशयाचे बॅनर लावत पावशे यांनी
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल व्यवसायावर थेट हल्ला केला आहे. त्यामुळे या घटनेने दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बॅनरवर असलेल्या आशयामुळे हा वाद उफाळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटातील कल्याण पूर्वेतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटाच्या बॅनरबाजीनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया मिळते, हे पाहावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.