कल्याणमध्ये दुचाकीची तोडफोड आणि हाणामारी
संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल नाही
परिसरात गोंधळाचे वातावरण
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक परिसरात भररस्त्यात झालेल्या हाणामारीची घटना समोर आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दुचाकीची तोडफोड आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या वादाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पावशे चौक परिसरातील एका कार्यालयात काही कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संतप्त झालेला एक तरुण कार्यालयाबाहेर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये लाल रंगाची टोपी घातलेला हा तरुण कार्यालयाबाहेर उभी असलेल्या दुचाकीजवळ जाताना दिसत आहे. संतापाच्या भरात त्याने दुचाकीला जोरदार लाथ मारून ती खाली पाडली. त्यानंतर त्याने वाहनाची तोडफोड करण्यास सुरुवात केल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
हा प्रकार लक्षात येताच कार्यालयातील कर्मचारी आणि संबंधित व्यक्ती तातडीने बाहेर आले. सुरुवातीला त्यांनी तरुणाला शांत करण्याचा आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आक्रमक होत असल्याचे दिसून आल्याने काही जणांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वयोवृद्ध महिलेने मध्यस्थी करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मारहाण थांबली आणि वातावरण काही प्रमाणात निवळल्याचे सांगितले जात आहे.
या प्रसंगामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. काही काळ नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिस स्वतःहून या घटनेची दखल घेणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच, वादाचे मूळ कारण आणि मारहाणीत सहभागी असलेल्या व्यक्तींची भूमिका याबाबतही अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.