संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईसह देशभरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीला मोठा धक्का बसला आहे. टोळीतील महत्त्वाचा कमांडर आणि परदेशातून गुन्हेगारी कारवायांचे नेटवर्क चालवणारा हॅरी बॉक्सर याला अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई तुरुंगात असताना टोळीच्या महत्त्वाच्या कारवायांची सूत्रे हॅरी बॉक्सर सांभाळत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्याच्या अटकेला बिश्नोई टोळीसाठी मोठा धक्का मानले जात आहे.
हॅरी बॉक्सरचे मूळ नाव हरीचंद जाट असल्याचे सांगितले जाते. तो राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील रहिवासी असून शेतकरी कुटुंबातून आला आहे. सुरुवातीला जयपूरमध्ये तो किक बॉक्सिंगचे प्रशिक्षण वर्ग चालवत होता. मात्र, पुढे त्याचा गुन्हेगारी विश्वातील वावर वाढला. राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचे नाव समोर आले. लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा साथीदार म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. टोळीच्या वतीने व्यावसायिकांना फोन करून धमकावणे, खंडणीची मागणी करणे आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभाग घेणे अशा जबाबदाऱ्या त्याच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
२०२४ मध्ये डंकी रूटच्या माध्यमातून हॅरी बॉक्सर अमेरिकेत पोहोचल्याची माहिती आहे. अमेरिकेत वास्तव्यास असतानाही त्याने गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचा आरोप आहे. परदेशातून फोनद्वारे धमक्या देणे, खंडणी मागणे आणि भारतातील गुन्हेगारी नेटवर्कशी संपर्क ठेवणे, अशा कारवायांमध्ये तो सक्रिय असल्याचे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीतील गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा हे महत्त्वाचे चेहरे होते. मात्र, ते बिश्नोईपासून वेगळे झाल्यानंतर स्वतःचे स्वतंत्र नेटवर्क चालवू लागल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर हॅरी बॉक्सरचे टोळीतील महत्त्व वाढले. लॉरेन्स आणि अनमोलच्या अनुपस्थितीत टोळीच्या कारवायांमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची बनल्याची माहिती आहे.
कॅनडामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅफेवर गोळीबार झाल्यानंतर हॅरी बॉक्सरचे नाव चर्चेत आले होते. या घटनेनंतर समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये बॉक्सरच्या नावाने धमकी देण्यात आली होती. या ऑडिओमध्ये अभिनेता सलमान खानसोबत काम करणाऱ्या कलाकारांनाही लक्ष्य करण्याची धमकी दिल्याचे सांगितले गेले होते.
दरम्यान, मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ याच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर मुंबईसह देशातील विविध राज्यांमध्ये बिश्नोई टोळीचे नेटवर्क, त्यांचे हस्तक आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास सुरू आहे.
हॅरी बॉक्सरच्या अटकेमुळे बिश्नोई टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन, परदेशातून चालवले जाणारे खंडणीचे रॅकेट आणि भारतातील गुन्हेगारी कारवायांचे सूत्रधार यांच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अटकेनंतर तपास यंत्रणांच्या चौकशीत कोणते नवे खुलासे होतात, याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.