डोंबिवलीत साप चावल्याने ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू.
रुग्णालयात उपचारासह सोयींचा अभाव, कुटुंबाचा आरोप.
आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश.
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही, प्रतिनिधी
Dombivli Shocking : डोंबिवलीमध्ये साप चावल्याने ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुलीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. रुग्णालयात योग्य उपचार आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने मुलीचा जीव गेला असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षांची प्राणवी ही डोंबिवलीत तिच्या मामाच्या घरी आली होती. प्राणवी तिच्या मावशीच्या बाजूला झोपली असताना पहाटे पाचच्या सुमारास तिला सापाने चावा घेतला. ती झोपेतून उठून रडू लागली. रडताना पाहताच मावशीने प्राणवीला मिठी मारली. लहान असल्याने 'मला काय होतंय?' हे ती बोलून सांगू शकली नाही. थोड्या वेळात तिच्या मावशीलाही सापाने चावा घेतला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
प्राणवीला शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कल्याण-डोंबिवली भाग हा ग्रामीण भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणात साप असतात, रुग्णालयाकडे सापाचे औषध का नाही? ते मुंबईकडे का पाठवतात? असे सवाल प्राणवीच्या नातेवाईकांनी केला आहे.
या प्रकरणात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांना विचारणा केली आहे. या संदर्भात आम्ही रुग्णालयाकडून पूर्ण माहिती मागवली आहे. लवकरच याबाबत नेमकं काय घडलं ते समोर येईल असे दीपा शुक्ला यांनी सांगितले आहे. प्राणवीचा महापालिका रुग्णालयात मृत्यू झाल्याने तिच्या मावशीला कुटुंबियांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.