रश्मी पुराणीक
मुंबई: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नुकतेच मुंबई सत्र न्यायालयाने कथित महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) घोटाळ्यामध्ये निर्दोषत्व बहाल केले. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ यांनी 'सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही' असे वाक्य बोलून मागच्या पाच वर्षातील घटनाक्रम एका वाक्यात सांगितला. २०१५ पासून सुरु झालेला चौकशी, अटक आणि बदनामीचा फेरा काल अखेर संपला. छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ अटकेत असताना भुजबळ कुटुंबाच्या आधार स्नुषा शेफाली समीर भुजबळ आणि विशाखा पंकज भुजबळ बनल्या होत्या. तर पक्षातून खासदार सुप्रिया सुळे यांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता.
काल छगन भुजबळ यांना कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर आज छगन भुजबळ यांच्या दोन्ही सुनांनी सिल्व्हर ओक गाठून खासदार सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. छगन भुजबळ यांच्यावर जेव्हापासून सूडबुद्धीने कारवाई सुरु झाली, तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि संपुर्ण राष्ट्रवादी पक्ष भुजबळ यांच्या पाठी खंबीरपणे उभा होता. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अधूनमधून छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत होत्या. अटकेत असताना भुजबळ यांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उचलला होता.
१६ जून २०१५ रोजी लाचलुचपत विभागाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यापैकी पहिल्यांदा गुन्हा दाखल करुन भुजबळ यांच्या घरी छापे टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर १६ मार्च २०१६ रोजी छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली. दोन वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर ४ मे २०१८ रोजी छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाला होता. या तीन वर्षांच्या काळात भुजबळ कुटुंबियांनी मात्र खूप काही सहन केले. माध्यमातून रोज होणारी बदनामी, सततच्या चौकशीचा फेरा, छापेमारी यामुळे भुजबळ कुटुंबाला मनस्ताप सहन करावा लागत होता. यावेळी त्यांना गरज होती मानसिक आधाराची. ती गरज लक्षात घेऊन पवार कुटुंबियांनी त्यांच्याशी सुसंवाद ठेवून धीर देण्याचे काम केले.
आज छगन भुजबळ आरोपातून मुक्त झाले असले तरी त्यांची न्यायालयीन लढाई सुरुच राहणार आहे. मात्र मागच्या संघर्ष काळात ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानन्याचे आणि शत्रूलाही माफ करण्याचे मोठे मन छगन भुजबळ यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच त्यांच्या सुनांनी देखील अडचणीच्या काळात आपल्याला आधार देणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचे आभार मानले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.