सार्वजनिक ठिकाणी (Public Place) थुंकण्यामुळे (spit) कोरोना (Corona Virus), क्षयरोग (Tuberculosis) यासारख्या विविध रोगांचा प्रसार होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-यांवर मुंबई महापालिकेद्वारे २०० रुपयांचा दंड सध्या आकारण्यात येत आहे. गेल्या सुमारे ९ महिन्यांमध्ये १९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तिंकडून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तब्बल रुपये ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे, अशी माहिती उप आयुक्त (डॉ.) संगीता हसनाळे यांनी दिली आहे. याबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येते. (A fine of Rs 39.13 lakh was levied for spitting in public places)
याबाबत एका जनहित याचिकेच्या प्रकरणी उच्च न्यायालयाद्वारे देण्यात आलेल्या आदेशांनुसार ही कारवाई अधिक तीव्र करण्यासोबतच प्रभावी जनजागृती करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वावरताना आवर्जून मुखपट्टी (मास्क) वापरावी, वारंवार हात धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत आणि दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे रोगांचा प्रसार होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मधील कलम ४६१ अंतर्गत ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ तयार करण्यात आले आहेत. या नियमांची अधिकाधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय कार्यवाही करीत असते. याच उपविधीतील क्रमांक ४.५ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तिंकडून रुपये २०० इतकी दंड वसुली करण्यात येते. यानुसार गेल्या सुमारे ९ महिन्यांच्या कालावधीत रुपये ३९ लाख १३ हजार १०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.
Edited By- Anuradha
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.