छत्रपती संभाजीनगर जवळच्या झाल्टा येथे गावातील किरकोळ वादावरून दोन गटात तुंबळ राडा झाला. याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुढी पाडव्याच्या दिवशी झाल्टा गावात कानिफनाथाची मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीवेळी एका गटाच्या ट्रीपलसीट दुचाकीस्वार तरुणांनी हुल्लडबाजी करीत दुसऱ्या गटाच्या तरुणासोबत वाद घातला होता. तेव्हा एकाने त्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती. हा वाद तेथे संपला पण दुसऱ्या दिवशी वाद मिटविण्यासाठी गेलेल्या जमावाने पुन्हा राडा करीत महिला, पुरुषांसह सर्वांना घरात घुसून मारहाण केली. त्यामुळे गावात मोठा फौजफाटा तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे.
या राड्याप्रकरणी १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल शेख, हनिफ शेख, हुसेन शेख, सद्दाम शेख, अदिल पटेल, जाकेर शेख, जावेद शेख, शाहरूख शेख, साहिल शेख, फरान खान, गुड्डू शेख, मुन्ताज पठाण, आलीम शेख, अश्पाक शेख, इमरान शेख, अमन शेख अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गोरख शिंदे (५३ वर्षे) हे फिर्यादी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
रविवारी रात्री गावात कानिफनाथाची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीमध्ये गावातील अनेकजण सहभागी होतात. या मिरवणुकीत घरोघरी कान्होबाच्या काठीची पूजा केली जाते. त्यासाठी सर्वत्र रांगोळी काढलेली असते. मिरवणूक सुरु असताना आरोपी अमन शेख आणि इतर दोघे दुचाकीवर आले. त्यांना गावातील रमेश शिंदे यांनी इकडे गर्दी आहे, तू दुसरीकडून जा, असे सांगितले. मात्र, अमनने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे गोरख शिंदे यांचा मुलगा विशालने त्याला तिथून जाण्यास सांगितले. तेव्हा अमनने विशालला शिवीगाळ केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. विशालने त्याच्या कानशिलात लगावली होती.
सोमवारी सकाळी अब्दुल अकबर शेखने गोरख शिंदे यांना फोन करून रात्रीच्या भांडणाबाबत बोलायचे आहे. मुलांचे वाद आहेत, मिटवून टाकू, असे सांगितले. गोरख शिंदे यांनी मी अंघोळ करून येतो, असे सांगत फोन ठेवला. त्यानंतर साडेदहा वाजता पुन्हा कॉल आला. काहीवेळाने १५ ते २० जणांचे टोळके त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी अचानक विशालला मारायला सुरुवात केली. त्यानंतर जमावाने गोरख शिंदे यांच्यासह त्यांच्या घरातील महिलांनाही मारहाण केली. माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नांगरे, पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवाडे, उपनिरीक्षक उत्तम नागरगोजे, अंमलदार अजित शेकडे यांच्यासह मोठा फौजफाटा गावात दाखल झाला. त्यांनी जमावाला शांत केले.
गावात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. सर्वत्र शांतता आहे. याशिवाय, गावात दंगा काबू पथकासह मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण जमाव एकत्र करून गोंधळ वाढवू नये. गैरकायद्याची मंडळी जमविल्यास कारवाई केली जाईल. यापुढे गोंधळ केल्यास पोलिस कारवाई केली जाईल, असे उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.