अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
सचिन जगताप यांनी जागेवर दावा ठोकल्याने राष्ट्रवादीत अंतर्गत स्पर्धा वाढली
भाजपकडून सत्यजीत कदम यांचे नाव चर्चेत
प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे तिरंगी लढतीची शक्यता
अमरावतीत भाजपने प्रवीण पोटे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली
सुशील थोरात, अहिल्यानगर
राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीवरून विविध पक्षांत चुरस निर्माण झाली असून इच्छुक उमेदवारांनी हालचाली वाढवल्या आहेत. अहिल्यानगर विधान परिषद जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हालचालींकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर निवडणूक लढवण्याची चर्चा आहे.
अहिल्यानगर विधान परिषदेवर मागील वर्षी अरुण जगताप विजयी झाले होते. त्यांच्या निधनानंतर आता या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरुण जगताप यांचे पुत्र सचिन जगताप यांनी या जागेवर दावा ठोकला असून त्यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अंतर्गत स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे भाजपकडूनही या जागेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. देवळाली प्रवरा गावचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम (Satyajit Kadam MLC Election) यांनी विधान परिषदेवर आपला दावा मजबूत केला आहे. सत्यजीत कदम हे भाजपचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यांनी पक्षातील निष्ठावंतांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे. यालाच दुजोरा देत सभापती राम शिंदे यांनीदेखील या निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत दिले आहेत.
याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure BJP MLC Candidate) यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, अमरावती मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा प्रवीण पोटे पाटील यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रवीण पोटे पाटील (BJP Parvin Pote Patil) यांना भाजपकडून सलग तिसऱ्यांदा संधी देण्यात आली असून यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. महाविकास आघाडीने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. सुरुवातीला २९ मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचे नियोजन असले तरी आता प्रवीण पोटे पाटील १ जून रोजी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रितपणे जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.