Uddhav Thackeray MLA midnight meeting with Omraje Nimbalkar : महाराष्ट्र राजकारणात सध्या मध्यरात्रीच्या गुप्त घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आखलं जाणारं 'ऑपरेशन टायगर' फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रात्रीत एक मोठी खेळी खेळली आहे. नाराज असलेले खासदार ओमराजे निंबाळकर यांची मनधरणी करण्यासाठी ठाकरेंनी मध्यरात्रीच दोन मोठे नेते पुण्याला रवाना केले.
आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील तातडीने पुण्यात पोहोचले.त्यांनी ओमराजेंची भेट घेत मध्यरात्री खलबतं केली आहेत. उद्धव ठाकरेंनी केलेल्या सूचनेनुसार, सरदेसाई आणि कैलास पाटलांना ओमराजेंची मनधरणी करण्यात यश येईल का? याकडे लक्ष लागलंय.
वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील उद्धव ठाकरेंचा थेट निरोप घेऊन मध्यरात्री ओमराजेंच्या घरी पोहोचले होते. दोन्ही नेत्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याशी बंद दाराआड प्रदीर्घ चर्चा केली. ठाकरेंचे नेते पोहोचताच, एकनाथ शिंदेंच्या युवासेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही तातडीने ओमराजेंच्या घराबाहेर जमा झाले होते.
वरुण सरदेसाई काय म्हणाले?
ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले, "ओम दादा यांच्याबाबत जो काही निर्णय लागलाय, तो अपेक्षित नव्हता. मी पक्षाचा सचिव म्हणून त्यांची भेट घेतली. आमच्यात काही विषयांवर चर्चा झाली आहे, मात्र सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर बोलणं योग्य नाही. ते आजही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार आहेत. पहिल्यांदा आमदार आणि नंतर तीन वेळा खासदार झालेल्या ओमराजेंच्या परिवाराला या निकालामुळे धक्का बसला आहे, त्यावरच आम्ही चर्चा केली. ज्या गोष्टी जाहीर करायच्या असत्या, तर आम्ही उघडपणे भेटलो असतो."
कैलास पाटील यांना मनधरणीचा विश्वास
आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, "उद्धव साहेबांचा निरोप घेऊन आम्ही आलो होतो. ओमराजे यांनी २० वर्षे ज्या गोष्टीसाठी संघर्ष केला, त्यांना न्याय मिळाला नाही. आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ओमराजेंची मनधरणी करण्यात यश येईल. साहेबांच्या प्रति त्यांची भावना आजही कायम आहे आणि ते पक्षातच राहतील. ओमराजेंनी 'उद्याचा एक दिवस द्या, त्यानंतर ठरवतो' असं सांगितलं आहे."
घराबाहेर शिंदे गटाचा पहारा; राजकारण तापलं!
ठाकरे गटाचे आमदार ओमराजेंना भेटायला आल्याची माहिती मिळताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मध्यरात्री ओमराजेंच्या घराबाहेर दाखल झाले. युवासेनेचे सचिव किरण साळी यांनी ठाकरे गटावर थेट हल्लाबोल केला. "विश्वगुरू माध्यमांसमोर अपशब्द वापरतात आणि दुसरीकडे मध्यरात्री या लोकांना भेटायची वेळ का आली? जर वेळ पडली, तर आम्ही ओमराजे यांच्यासोबत थेट धाराशिवला जाऊ," अशी आक्रमक भूमिका किरण साळी यांनी मांडली.
त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या मध्यरात्रीच्या या डावानंतर आता ओमराजे निंबाळकर काय निर्णय घेतात आणि 'ऑपरेशन टायगर' यशस्वी होतं की फेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.