जालना : राज्यातील अनेक भागात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. याचा फटका शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. यातच जालन्यातील भोकरदन तालुक्यात आज अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेत पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच वाशीम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला आहे.
हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मागील तीन- चार दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रब्बी हंगाम असल्याने अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका काढणीवर आले आहेत. अशात अवकाळी पाऊस होत असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
भोकरदन तालुक्यात गारपीट
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे काढणीला आलेला मका पीक पावसामुळे आडवा पडला आहे. भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा, कोदा या परिसरात अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला. यात गावातील जनार्धन मुठ्ठे या शेतकऱ्याचं एक एकर मकाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
वाशीम जिल्ह्यात जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस
वाशीम : वाशीम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाशिमसह रिसोड, मालेगाव शहर आणि मसला, पेन, केशवनगर आणि परिसरातील ग्रामीण भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यात दोन दिवसाचा यल्लो अलर्ट जारी केला. या अवकाळी पावसामुळे हळद, बीजवाई, कांदा आणि ज्वारी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोलापुरात मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात देखील आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे प्रचंड उकाडा देखील जाणवत होता. यातच दुपारच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात झाली. मागील काही दिवसात तापमान चाळीशी पार गेले होते. मात्र या पावसामुळे सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.