Unseasonal Rain Saam TV Marathi
महाराष्ट्र

Unseasonal Rain : महाराष्ट्रावर निसर्गाचा कोप! अवकाळी पावसामुळे ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बळीराजा पुन्हा संकटात

Unseasonal rain Maharashtra News : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. विजांचा कडकडाट, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

Namdeo Kumbhar

unseasonal rain in Maharashtra causes deaths and crop damage : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत अवकाळी पावसाने हाहाकार घातला आहे. निसर्गाच्या या कोपामुळे सोमवारी राज्यात ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगरसह राज्यातील अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने फक्त जनजीवनच विस्कळीत केले नाही तर हातातोंडाशी आलेला शेतीचा घासही हिरावून घेतल्याने बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. सातारा, जालना, नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये आलेल्या निसर्गाच्या प्रकोपामुळे ५ जणांचा मृत्यू झालाय. जालना जिल्ह्यात वीज कोसळल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून १४ वर्षीय यश शिंदे या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, हे संकट अद्याप टळलेले नाही. पुढील २-३ दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोकणातही काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूरमध्ये मध्यरात्रापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.

आठवीच्या मुलाचा मृत्यू -

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नाशिकच्या मालेगावमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. वनपट गावात भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलाचे नाव यश प्रवीण शिंदे असे आहे. यश हा आठवीचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. गुरांच्या शेडजवळ उभा असताना अचानक भिंत अंगावर कोसळली अन् यशचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात हळहळ आणि शोककळा व्यक्त केली जात आहे.

सातारा-अहिल्यानगरमध्ये मोठी दुर्घटना -

साताऱ्यात पावसाने हाहाकार माजवलाय. खंडाळामधील कराडवाडी गावामध्ये सोनाली अजित कराडे या 29 वर्षाच्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून शिवाजी रघुनाथ खेडकर या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाऊस सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेत त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही मृत्यू झाला.

जालन्यात २ जणांचा दुर्दैवी मृत्यू -

जालना जिल्ह्यातील सोमवारी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. जालन्यातील महाकाळा येथील दोन तरुणांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गोविंद प्रल्हाद लहाने आणि महादेव दगडू बेद्रे असं मयत झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण पाऊस सुरू असताना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती येथे लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. मात्र लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे..

सोलापुरात नारळाच्या झाडावर वीज कोसळली; मोठी दुर्घटना टळली

दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर शंकर नगर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसात विंचूर शिवारातील गुरव वस्ती - खंदारे वस्ती भागात एका नारळाच्या झाडावर थेट वीज कोसळली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ऐन उन्हाळ्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे आणि विजांच्या लखलखाटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी विजा कडाडत असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

नाशिकमध्ये ढगफुटीसदृश पाऊस आणि गारपीट

नाशिकच्या बागलाण तालुक्यात सोमवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह भीषण गारपीट झाली. या अवकाळी संकटामुळे सटाणा शहर आणि परिसरात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका कांदा, द्राक्ष, डाळिंब आणि आंबा बागांना बसला आहे. बोराच्या आकाराच्या गारा पडल्यामुळे बहरलेली पिके मातीमोल झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा हात द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पाऊस

Farmer Loan: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा,बँकर्स कमिटीचा अहवाल तयार

Sangli Crime: सांगली जिल्हा हादरला, एकाच दिवसात ३ जणांची निर्घृण हत्या

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांच्या पगारातून दरमहा 10 हजार कापणार, या राज्य सरकारचा निर्णय

Morning Skincare Routine: चेहरा दिसेल दिवसभर टवटवीत, सकाळी उठल्यावर करा हे रुटीन फॉलो

SCROLL FOR NEXT