शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही, म्हणून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी होणार आहे.
मागच्या महिन्यात कोर्टाने या सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या होत्या मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती. कोर्टाने आजची तारीख सुनावणीसाठी निश्चित केली असल्याने आज तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे निवृत्त होणार असल्याने या प्रकरणाचा निकाल त्यापूर्वी लागणे अपेक्षित आहे. आज कोर्टाने प्रकरण ऐकलं तर सुनावणीची दिशा निश्चित होईल.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि उज्ज्वल भूयान यांच्या पिठासमोर सुनावणी होणार आहे.
२ आठवड्यांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रकरण मेंशन करतेवेळी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महत्वाची मागणी करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने कोर्टाकडे केली होती.
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. 7 जिल्ह्यांतील 40 विधानसभा जागांवर आज मतदान पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील 40 जागांपैकी 24 जागा जम्मू विभागातील आणि 16 काश्मीर खोऱ्यातील आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी 39.18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या टप्प्यात संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या अफझल गुरूचा मोठा भाऊ एजाज अहमद गुरू देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. एजाज गुरु सोपोर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे. पोलिसांकडून आज देखील मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आलाय.
लडाखपासून 700 किमी चालत दिल्लीत पोहोचलेले हवामान आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह 120 जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि केंद्रशासित प्रदेशाला सहाव्या अनुसूचीचा दर्जा देण्याची सोनम वांगचुक यांची मागणी आहे.,
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांना अलीपूर आणि शहराच्या सीमेवर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे. वांगचुक आणि इतरांना सीमेवर रात्र घालवायची होती मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय.
शांततेने मोर्चा काढणाऱ्या सोनम वांगचुक आणि शेकडो लडाख्यांना ताब्यात घेणे पूर्णपणे चुकीचे आहे.मोदीजी शेतकऱ्यांप्रमाणेच हे चक्रही तुटेल आणि तुमचा अहंकारही मोडेल. तुम्हाला लडाखचा आवाज ऐकावा लागेल, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
आचारसंहिता लागण्याआधी दोन महिने एसटी महामंडळाचे अध्यक्षपद मिळालं असतं तर तुमच्या आमदाराने चुणूक दाखवली असती, असे भरत गोगावले म्हणालेत.
महाडचे आमदार भरत गोगावले यांचा नागरी सत्कार सोमवारी महाडमध्ये करणात आला. सत्कार करण्यासाठी बाहेरून मोठा माणूस बोलावण्याची पद्धत आहे पण मतदारसंघातील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते गोगावले यांचा सत्कार महाडकरांनी केला. या वेळी गोगावले भावूक झाले आणि त्यांनी गावातील शालेय जीवन, मुंबईतील काबाडकष्ट, पुन्हा गावाकडे आगमन असा राजकिय प्रवास आगदी मनमोकळेपणाने सांगितला.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार बीडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमित शहा यांच्या मागली दौऱ्यावेळीही अजित पवार अनुपस्थित होते, त्यामुळे चर्चा झाली होती. आज अमित शहा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर महायुतीच्या इतर नेत्यांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने अजित पवारांचे आज दिवसभर माजलगाव आणि परळीत कार्यक्रम आहेत. अमित शहा यांचा आज रात्रीचा मुक्काम मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर असल्याने तेथे महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली.
हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाची शक्यता लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने ठाणे जिल्ह्यातील वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
बदलापुरात चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलंय. या प्रकरणाला दीड महिना होऊन गेल्यानंतर सुद्धा रेल्वे पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभाग आजही आंदोलकांची धरपकड करत आहेत. याशिवाय ज्या आंदोलकांना भिवंडी येथील गुन्हे अन्वेषण विभागात हजेरी द्यावी लागत आहे. अक्षय शिंदेला शिक्षा झाली, पण आंदोलकांचा त्रास मात्र कायम आहे.
रत्नागिरी शहरातील सहा पुतळ्यांची रेडिओलिजिस्ट तपासणी केली जाणार आहे. शहरातील सहाही पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालेय. आता रेडिओलिजिस्ट सहाही पुतळ्यांचं स्कॅनिंग करून मजबूतीची खात्री करणार आहेत.
माळनाका येथील शामराव पेजे यांचा पुतळा, मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, लक्ष्मी चौक येथील विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा, थिबा पॉइंट येथील छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा, माळनाका येथील शिर्के उद्यानातील विठ्ठलाची मूर्ती अशा सहा पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.