Raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Election : 'इंजिन' धावलंच नाही! राज ठाकरेंच्या मनसेच्या पराभवाची कारणं काय?

Maharashtra Election Result : राज ठाकरे यांच्या मनसेचं या निवडणुकीत काय चुकलं, नेमकं कुठे बिघडलं. मनसेकडे जनतेने पाठ का फिरवली?

Namdeo Kumbhar

MNS party status Maharashtra Election Result : राज ठाकरेंच्या मनसेचा आजपर्यंतचा सर्वात मोठा पराभव झालाय. मनसेकडे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेनं पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वादळात मविआसह छोट्यामोठ्या पक्षांनाही मोठा धक्का बसलाय.

मविआला ६० आकडाही पार करता आला नाही. मनसेची अवस्था तर सर्वात कठीण झाली. मनसेची मान्यता रद्द होण्यापर्यंत स्थिती पोहोचली आहे. त्याला जबाबदार कोण? अशी प्रश्नार्थक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कारण यापूर्वी त्यांचा फक्त एक आमदार होता. पण यावेळी त्यांनी आपला मुलगा अमित ठाकरेंना माहीममधून निवडणुकीला उभे केले होते. त्यामुळे यावेळी मनसेची जादू चालणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते.

पण या निवडणुकीत मतदारांनी मनसेकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत मनसेचे गणित नेमके कुठे चुकले? राज ठाकरे यांच्या मनसेचं या निवडणुकीत काय चुकलं, नेमकं कुठे बिघडलं? मनसेकडे जनतेने पाठ का फिरवली? मनसेच्या पराभवाची कारणं काय आहे, याचा थोडक्यात आढावा घेतलाय.

पक्ष बांधणीत फेल, सातत्य नाही -

२००९ विधानसभेला राज ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र उभा राहिला होता. पहिल्याच निवडणुकीत राज ठाकरेंचे १३ आमदार निवडून आले होते. पण त्यानंतर राज ठाकरेंना पक्षबांधणी करता आली नाही. २०१४ मध्ये राज ठाकरेंच्या मनसेला फक्त एकाच जागेवर विजय मिळाला होता. पाच वर्षांत १३ वरून थेट एका जागेवर घसरण झाल्यानंतरही राज ठाकरेंना पक्षाची बांधणी करण्यात यश आलं नाही, असं बोलले जात आहे.

२०१९ मध्येही राज ठाकरेंना जोरदार धक्का बसला होता. फक्त एकच आमदार निवडून आला. आता २०२४ मध्ये मनसेच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. राज ठाकरेंनी १२३ जागांवर उमेदवार उतरवले होते, पण सुपडासाफ झाला.

दुसऱ्या फळीला वाव नाही

राज ठाकरेंच्या मनसेमध्ये दुसऱ्या फळीला म्हणावा तसा वाव मिळाला नाही. प्रवीण दरेकर, राम कदम, दिलीप लांडे यासारखे नेते अल्पकाळातच मनसेला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. इतर पक्षात जाऊन ते नेते सध्या महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांमध्ये गणले जाऊ लागले. बाळा नांदगावकर आतापर्यंत मनसेमध्येच आहेत, पण २००९ नंतर त्यांना विजय मिळवता आला नाही. दुसरी आणि तिसरी फळी निर्माण करण्यात मनसेला अपयश आले, त्याचा मोठा फटका बसलाय, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

जनसंपर्क नसणे

२००९ मध्ये मनसेला मोठं मताधिक्य मिळालं होत. पण त्यानंतर हळूहळू मनसेची लोकप्रियता आणि मताधिक्य कमी होत गेलं. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा केला. मराठी माणसासाठी आवाज उठवला. नोकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले. त्यावेळी मनसेची प्रसिद्धी वाढली. त्याचा फायदा २००९ च्या निवडणुकीत झाला. पण त्यानंतर राज ठाकरे आणि मनसेकडून हवं तसं काम स्थानिक पातळीवर झालं नाही. त्याचा फटका मनसेला बसला. ती कसर अद्याप भरून काढता आलेली नाही, असे बोलले जात आहे.

वारंवार बदलेली भूमिका

राज ठाकरेंनी प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलली, त्याचा फटका या विधानसभेला बसल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत. राज ठाकरे कधी भाजपच्या बाजूने भाषणे करतात, तर कधी शरद पवार यांचं जाहीर मुलाखतीत कौतुक करतात. पुन्हा सभेत त्यांच्यावरच टीका करतात. लोकसभा निवडणुकीला पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. पण विधानसभेला युती न करता स्वबळावर लढले. वारंवार घेतलेल्या अशा प्रकारच्या भूमिकांमुळे मतदारवर्ग संभ्रमात पडला. त्याचा परिणाम मतपेटीवर झालेला दिसून येतो, असे सांगण्यात येत आहे.

मायक्रोप्लानिंग -

यंदाच्या विधानसभेत राज ठाकरेंच्या मनसेचे १२३ उमेदवार मैदानात उतरले होते. महायुतीमधील भाजपनंतर मनसेचे सर्वाधिक उमेदवार होते. पण मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. मनसे विधानसभेच्या प्लानिंगमध्येही कमी पडल्याचं दिसतेय. विधानसभा प्रचारासाठी राज ठाकरेंनी सभांचा धडका लावला होता. सभांना गर्दी पण त्याचं मतांमध्ये रुपांतर झालं नसल्याचं या विधानसभा निवडणुकीतही दिसलं. अविनाश जाधव वगळता एकाही उमेदवाराने विशेष असे प्रयत्न केल्याचं दिसत नाहीत. विधानसभेसाठी ज्या पद्धतीने प्लानिंग करण्याची गरज होती, तशी तयारी मनसेकडून झाली नसल्याचं यातून दिसून येत आहे, असं राजकीय वर्तुळातील जाणकारांचं म्हणणं आहे.

ठाकरेंवर वारंवार टीका

मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे मतदार जवळपास सारखेच आहेत. राज ठाकरेंनी शिवसेनेतून निघून मनसेची स्थापना केली. स्वतंत्र पक्ष निर्माण केला, त्यानंतर चांगलं यश मिळालं. पण गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंवर वारंवार टीका केली जात आहे. मनसेचे जुने कार्यकर्ते कधीकाळी शिवसेनेत होतेच, त्यामुळे ठाकरेंवर वांरवार केलेली टीका, काही मतदारांना रुचली नसेल, असा अंदाज आहे. विधानसभेला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच गद्दार म्हटलं होतं. वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणं, काही मतदारांच्या पचनी पडली नसावी आणि त्याचाच फटका काही प्रमाणात मनसेला बसला असेल, अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT