अमरावती: मुलगा-मुलगी असा भेद आम्ही पाळत नाही. मुलगा असता तर त्याची लग्नाच्या वेळी घोड्यावर बसवून मिरवणूक काढलीच असती. मात्र, मला मुलगा नाही, अशावेळी आम्ही आमच्या मुलीलाच मुलाच्या जागी पाहतो आणि तिची सुद्धा घोड्यावरून जल्लोषात मिरवणूक काढण्याचे ठरवले होते. शहरातील दस्तुरनगर भागातील जीवनज्योती कॉलनीमध्ये राहणाऱ्या प्रशांत देशमुख यांच्या अभियंता कन्येचा शनिवारी थाटात विवाह होणार आहे तत्पूर्वी गुरुवारी सायंकाळी देशमुख कुटुंबियांनी वधुची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. ही मिरवणूक परिसरात चांगलीच उत्सुकतेचा विषय ठरली होती.
प्रॉपर्टी व्यावसायिक असलेल्या प्रशांत आनंदराव देशमुख यांना एकुलती एक वैष्णवी ही कन्या आहे. वैष्णवीने अभियांत्रिकीची पदवी घेतली असून, तिचा खामगाव येथील अभियंता युवकांसोबत विवाह शनिवारी शहरातच होणार आहे. दरम्यान, घोड्यावर बसण्याची वैष्णवीची इच्छा होती तसेच वडील प्रशांत व आई शिल्पा यांनीसुद्धा मुलीमध्ये मुलाला पाहिले असल्यामुळे हा निर्णय घेतला होता. गुरुवारी सायंकाळी वैष्णवी निळ्या रंगाच्या नऊ वारीमध्ये पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर बसून, घरापासून निघाली. परिसरातील कॉलनींमधून वाजत-गाजत मिरवणूक फिरली. यावेळी परिसरातील काही नागरिक व पाहुण्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
दरम्यान, आपल्या भागात घोड्यावर बसलेली नवरी क्वचितच दिसते. त्यामुळे घोड्यावर बसलेली ही नवरी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच मिरवणूक फिरत असताना परिसरातील प्रत्येक घरातील मंडळी ही मिरवणूक पाहण्यासाठी आवर्जून घराबाहेर आलेले दिसत होते.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.