जिद्दीच्या जोरावर बीडच्या अभिजित पाखरेंनी यूपीएससी परीक्षेत यशाला गवसणी घातलीय. बीडच्या शिरूर तालुक्यातील पाडळी येथे प्राथमिक शिक्षण घेत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत बीडीओ म्हणून नोकरी मिळवली. नोकरी करत करत यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला. चारवेळा अपयश आले तरीही खचून न जाता पाचव्यांदा यश मिळवत आपलं लक्ष्य गाठणाऱ्या अभिजित पाखरे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (Maharashtra News)
अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीड शहरातील चंपावती विद्यालयात झाले. अभिजीत पाखरे यांचे आई वडील शिक्षक आहेत. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतचे सरपंचही आहेत.
सन 2019 मध्ये अभिजीत पाखरे यांनी एमपीएससीची परिक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची पहिली नियुक्ती होणार होती.
यावेळी त्यांनी आदिवासी बहुल मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेचा प्रारंभ करण्यासाठी वरिष्ठांना गडचिरोलीत पोस्टींग द्या अशी विनंती केली. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
कष्टाचे सार्थक झाले : अभिजीत पाखरे
शासकीय सेवेत कार्यरत असतांना त्यांनी युपीएससीसाठी तयारी सुरुच ठेवली. चार वेळा अपयश आल्यानंतरही सातत्याने आठ ते दहा तास अभ्यास करत पाचव्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. सध्या ते निवडणूक कर्तव्यावर असतांना ही गोड बातमी समजल्यानंतर कष्टाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी साम टीव्हीला दिली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अभिजीत पाखरे यांना बीडीओ म्हणून नियुक्ती मिळण्यापूर्वी त्यांनी प्रधान सचिवांना स्वतःहून गडचिरोलीत पोस्टींग द्या, अशी विनंती केली होती. आदिवासी बहुल भागात शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचा त्यांचा हेतू होता. या भागात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केल्यानंतर त्यांना अहेरी या अत्यंत संवेदनशील भागात नियुक्ती देण्यात आली होती. सध्या ते याच ठिकाणी कार्यरत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.