Anil Parab Saam TV
महाराष्ट्र

पहिली इलेक्ट्रिक बस धावणार, 'शिवाई'चा १ जूनला पुण्यात लोकार्पण सोहळा

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : वातावरणातील प्रदुषण कमी करण्याच्या उद्देशाने वाहन क्षेत्रातील सर्वाधिक मोठा सार्वजनिक उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस (electric bus) दाखल होणार आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी बिरूदावली मिरवणारी 'लालपरी' अर्थात एसटी १ जून २०२२ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पुणे येथे बुधवारी (१ जून ) होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे,अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी आज दिली.या सोहळ्याला सर्व एसटी प्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहावे,असे आवाहनही ॲड.परब यांनी केले आहे. १ जून, १९४८ रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्यावतीने दरवर्षी १ जून रोजी एसटीचा वर्धापनदिन साजरा केला जातो.

यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपली एसटी सुद्धा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे,हा एक दुग्धशर्करेचा योग आहे,अशा शब्दात ॲड.परब यांनी आनंद व्यक्त केला. १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस पुणे-अहमदनगर-पुणे अशी धावली होती. त्याचपार्श्वभूमीवर बुधवारी,पुणे येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'शिवाई'चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर ही बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावेल.याशिवाय विद्युत प्रभारक केंद्राचेही उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान,अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे.ही बस पुण्यापर्यंत धावेल.१ जून १९४८ रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे,असेही परब यांनी सांगितले.

शिवाईच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्यानिमित्त शिवाजीनगर येथील बालगंधर्व सभागृहात मुख्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत,असेही परब म्हणाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील,विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे,परिहवन राज्यमंत्री सतेज पाटील,सार्वजनिक बांधकाम,मृद व जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट,आमदार माधुरी मिसाळ तसेच परिवहन आणि बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकिय संचालक शेखर चन्ने आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर,वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला, असेही परब यांनी सांगितले. लोकार्पण केल्यानंतर 'शिवाई'च्या पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर दिवसाला ६ फेऱ्या होणार आहेत.यानंतर टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील,असे सांगतानाच आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर व आरामदायी प्रवासामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल,असा विश्वासही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

२५ वर्षे विना अपघात सेवा करणाऱ्या चालकांचा सत्कार

अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विना अपघात सेवा देऊन प्रवाशांना सुखरूप त्यांच्या इच्छितस्थळी नेऊन सोडणाऱ्या चालकांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे, अशी अपघात विरहीत सेवा देणाऱ्या ३० चालकांचा सपत्नीक विशेष गौरव केला जाणार आहे,अशी माहितीही अनिल परब यांनी दिली.

'शिवाई'ची ठळक वैशिष्ट्ये…

- बसची लांबी १२ मीटर

- टू बाय टू आसन व्यवस्था

- एकूण ४३ आसने

- ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी

- गाडी ताशी ८० किमी वेगाने धावणार

- बॅटरी क्षमता ३२२ के.व्ही.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT