आमदार अपात्रता याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर झालेल्या मागील सुनावणीत पुढील तारीख २१ नोव्हेंबर देण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणी कोणताही निकाल लागलेला नसला तरी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडलं जात आहे. अशात शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी आमदारांच्या संख्येबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय.
संजय राऊत सध्या पोपटाच्या भूमिकेत आहेत. पहिले ते दलालाच्या भूमिकेत होते. आता ते पोपटाच्या भूमिकेत आहेत. म्हणून निकालाची चिंता आता करू नका. सरकार काही जाणार नाही. जाणार असतील तर ते जाणार आहेत. त्यांच्याजवळ असलेले १५ आमदार जाणार आहेत. ३१ डिसेंबर नंतर त्यांचे १५ आमदार शिवसेना शिंदे गटाकडे असतील हे तुम्हाला निश्चित सांगतो, असं संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठामपणे सांगितलं आहे.
शिंदे आणि ठाकरे गटाच्या परस्परविरोधी एकूण ३४ याचिका दाखल करण्यात आल्यात. या याचिका सहा गटात वर्गिकरण करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या परस्परविरोधातील आमदार अपात्रता याचिकांवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राहुल नार्वेकर यांना दिले आहेत.
आमदार अपात्रता याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी असं ठाकरे गटाचं मत होतं. मात्र शिंदे गटाच्या वकिलांकडून याला विरोध करण्यात आला होता. प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते. तसेच पुरावे सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करत ४० आमदारांसह सुरत गाठली होती. त्यानंतर ठाकरे गटाकडे १५ आमदार शिल्लक आहेत. आता हे १५ आमदार देखील ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात जाणार असं, संजय शिरसाटांनी म्हटल्यानं ३१ डिसेंबरला काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.