Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंच्या फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा; संजय राऊत यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

Political News : त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली 'पांढरा' करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे.", असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Ruchika Jadhav

श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे. या फाउंडेशनमार्फत जनतेला अगदी त्वरित वैद्यकीय मदत देण्यात येते. मात्र फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा यासाठी खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे.

काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा

"देशातील भ्रष्टाचार, काळ्या पैशांचे व्यवहार मोडून काढण्यासाठी आपण गेल्या १० वर्षांपासून अथक परिश्रम करीत आहात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आपण जनतेला पुन्हा एकदा तेच आश्वासन दिले. त्यानिमित्त महाराष्ट्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे आणि गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा समाजकार्याच्या नावाखाली 'पांढरा' करण्याचा एक धंदा मी आपल्या निदर्शनास आणत आहे.", असं राऊतांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

एकूण तीन पानांच्या या पत्रात राऊतांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर अनेक आरोप केलेत. "सदर फाऊंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची सार्वजनिक धर्मादाय न्यासाने सखोल चौकशी करावी अशी तक्रार प्रसिद्ध वकील श्री. नितीन सातपुते यांनी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे, पण या तक्रारीस एक महिना उलटून गेला तरी ठाणे धर्मादाय आयुक्तांकडून तक्रारीची साधी दखल घेतली गेली नाही. धर्मादाय आयुक्तांवर राजकीय दबाव असल्यामुळेच ते माहितीच्या अधिकारातही याबाबतची माहिती द्यायला तयार नाहीत असे दिसते."

खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय?

"महाराष्ट्राला सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. अनेक समाजसेवकांनी प्रसंगी पदरमोड करून संस्थात्मक कार्य केले आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्य होत असेल तर त्यास आक्षेप असण्याचे कारण नाही. या फाऊंडेशनतर्फे अनेक शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम घेतले जातात व ते अत्यंत भव्य स्वरूपात होतात. ते कार्य कौतुकास्पद आहेच, पण या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. ", असे प्रश्न राऊतांनी या पत्रातून विचारले आहेत.

"श्रीकांत शिंदे फाऊंडेशन अनेक गरजूंना 'रोख' स्वरूपातदेखील मदत करते. मनोरंजनाच्या अनेक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यासाठी भव्य मंडप, देखावे, रोषणाई, कलाकारांचे संच ज्यांचा मेहनताना कोट्यवधीचा आहे. त्यांना बिदागीच्या रकमा कोणत्या माध्यमातून दिल्या गेल्या? त्याबाबत धर्मादाय आयुक्तांनी प्रकाश टाकायलाच हवा.", असं राऊतांनी या पत्रात म्हटलं आहे.

उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे

"श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वैद्यकीय उपक्रम घेते. वैद्यकय मोफत उपचार करते असे सांगितले गेले. ते उपक्रम नक्कीच वाखाणण्यासारखे आहेत, पण याबाबत ज्यांनी देणग्या दिल्या त्यांची पार्श्वभूमी काय? ते तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी देणग्या दिल्या ते मुख्यमंत्री कार्यालयाचे लाभार्थी आहेत काय?", अशा शब्दांत राऊतांनी या फाऊंडेशनचे आणि श्रीकांत शिंदेंच्या कार्याचे कौतुक करत मोठा प्रश्न उपस्थित केलाय.

५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले

"श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संबंध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी असल्याने त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे होते. या फाऊंडेशनवर मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती सदस्य आहेत? फाऊंडेशनचे आतापर्यंतचे सर्व हिशेबे धर्मादाय आयुक्तांकडे सुपूर्द केले आहेत काय? याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या फाऊंडेशनसाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कक्ष उघडला आहे व त्या माध्यमातून बिल्डर, ठेकेदारांकडून रोखीत रकमा घेतल्या जातात. आतापर्यंत किमान ५०० कोटी रुपये या माध्यमातून जमा केले आहेत.", असा आरोपही राऊतांनी या पत्रातून केलाय.

मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे

"श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे इर्शाळवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे. तसेच या संकटामुळे अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनने स्वीकारली आहे. सदर बाब ही माणुसकी धरूनच आहे, परंतु अशा कार्यासाठी खूप मोठा निधी लागतो. सदर निधी ज्या देणगीदारांकडून प्राप्त झाला असेल त्यांचा योग्य सन्मान आणि त्यांच्या दातृत्वाची पुरेशी प्रसिद्धी होणे उचित ठरेल, परंतु सदर उपक्रम हाती घेताना शासकीय निधीचा वापर करून जर कोणी राजकीय व्यक्ती त्याचे श्रेय घेत असेल तर ते नुसते अनैतिक नसून गुन्हेगारी स्वरूपाचेदेखील आहे. यास मराठीमध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणे असे म्हणतात." अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केलाय.

"नागरिकांना गणपतीच्या सणासाठी गावी जाण्यासाठी एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात त्यांच्या गाड्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला उपलब्ध करून दिल्याचे वर्तमानपत्रातून समजले. सदर गाड्यांचे पैसे प्राप्त झाले आहेत किंवा नाही याची माहिती करदात्या नागरिकांस होणे आवश्यक आहे. कारण जर पैसे प्राप्त झाले नसतील तर हा शासकीय निधीचा गैरवापर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. जर निधी प्राप्त झाला असेल तर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून निधीच्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध होणे किंवा नागरिकांना सदर बाब समजणे आवश्यक आहे. देणगीदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशनला कोणत्या कारणासाठी पैसे देतात की धार्मिक बाब म्हणून कोट्यवधी रुपयांची दक्षिणा देतात, याचा खुलासा आवश्यक आहे.", पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात राऊतांनी हे देखील लिहिलं आहे.

तसेच या सर्वांवर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या आर्थिक बाबीसंबंधी संशय बळावण्यास काय कारण आहे हे देखील त्यांनी या पत्रात सांगितलंय, "या संस्थेच्या जाहिरातीमध्ये ज्या प्रमुख नेत्यांचे छायाचित्र झळकते ते या न्यासाचे विश्वस्त नाहीत. न्यासाचे विश्वस्त सामान्य व्यक्ती आणि छोटे व्यावसायिक आहेत. त्यामुळे सदर न्यासाला निधी कोणाकडून प्राप्त होतो? कशासाठी प्राप्त होतो? कोणत्या प्रकारे प्राप्त होतो? याचा कायदेशीररीत्या खुलासा अत्यावश्यक आहे."

"या न्यासाला मिळणारा निधी हा Quid pro Quo या स्वरूपाचा नाही हे सिद्ध होणे आवश्यक आहे. वरील बार्बीचे गांभीर्य १९८० साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या न्यासासाठी शासकीय यंत्रणेच्या आणि शासकीय अधिकारांचा Quid pro Quo यानुसार गैरवापर केला म्हणून मुंबई हायकोर्टाने त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरविले होते आणि त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता (सदर खटला दाखल करणारे त्यावेळेच्या जनसंघाचे / भाजप खासदार रामदास नायक हे होते). देशात अलीकडेच 'चंदा दो धंदा लो' हे प्रकरण गाजत आहे.

"सरकारने अनेक उद्योगपती, कंपन्या, ठेकेदारांना 'कामे' देऊन भाजपच्या खात्यात निवडणूक रोखेंच्या माध्यमातून ८,००० कोटींचे धन जमा केले. माननीय सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखे रद्द करताना सरकार आणि निवडणूक रोखे भाजपला देणारे यांचे Quid pro Quo (काहीतरीसाठी काहीतरी) हा संबंध पुराव्यासह जोडला. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडे अशाच मार्गाने आलेल्या कोट्यवर्षीच्या रकमांचा 'मार्ग' गुन्हेगारी स्वरूपाचा, मनी लॉण्डरिंग प्रकारचा प्रथमदर्शनी दिसतो. ही बाब गंभीर आहे व आपण त्याबाबत तत्काळ गुन्हा नोंद करून साधारण ५०० ते ६०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तत्काळ ईडी, सीबीआयकडे सोपवून गुन्हेगारांना अटक करावी." अशी मागणी संजय राऊत यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT