Sanjay Gaikwad apologises for controversial statement on farmers : दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानावर आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. या विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अडचणी वाढल्यानंतर संजय गायकवाड यांनी यू-टर्न घेत जाहीर माफी मागितली आहे.
शेतकऱ्यांविषयीच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. 'शेतकऱ्यांविषयीची मुक्ताफळे खपवून घेतली जाणार नाहीत', अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी त्यांना तंबी दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. पक्षातून वाढलेला दबाव आणि राज्यभरातून उमटणाऱ्या तीव्र संतापानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी त्यांना पक्षाकडून होणाऱ्या कारवाईबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.
"मी हे विधान शेतकऱ्यांच्या संदर्भात अजिबात केले नव्हते. जी तरुण पिढी नशेच्या आहारी जाऊन आत्महत्या करते, त्यांची कुटुंबे उघड्यावर पडतात; त्यामुळे मी ते विधान केले होते. तरीही माझ्या या विधानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व पक्षाच्या वरिष्ठांना वाईट वाटले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असे संजय गायकवाड म्हणाले. दरम्यान, याआधीही वादग्रस्त विधानांमुळे संजय गायकवाड अडचणीत आले आहेत. "आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नका," असे वादग्रस्त विधान गायकवाड यांनी यापूर्वी केले होते, ज्यामुळे त्यांच्या अडचणींत भर पडली आहे.
"मी संपूर्णपणे शेतकरी कुटुंबातील आहे. माझे वडीलही शेती करायचे, त्यामुळे मी शेतकऱ्यांविषयी कधीही वाईट बोलू शकत नाही. अमली पदार्थांचे सेवन करून आपला संसार उघड्यावर टाकणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या लोकांबद्दल मी बोललो होतो. माझ्या विधानाचा विपर्यास करून वाद निर्माण करण्यात आला. तरीही यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, एकनाथ शिंदे यांनी आपल्या निलंबनाचा प्रस्ताव व आदेश दिल्याच्या मुद्द्यावर आमदार संजय गायकवाड यांनी फक्त "नो कॉमेंट्स" एवढेच उत्तर दिले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.