जालना : मुंबई-नागपूर ला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सळई घेऊन निघालेल्या टिप्पर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टिप्पर महामार्गाच्या कडेला जाऊन कोसळला. या टिप्पर वर बसलेल्या १६ कामगारांच्या अंगावर लोखंडी सळई पडल्या. या घटनेत १३ कामगारांचा नाहक बळी गेला आहे. विशेष म्हणजे हे सर्व तरुण कामगार आहेत.
यातील १२ कामगारांचे मृतदेह जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. एकाच वेळी इतके शव दाखल झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत सर्व कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.
आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्दवी घटना घडली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव-दुसरबिड जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर घडली आहे. तीन जण गंभीर असल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची देखील प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि कामगारांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांच्या अंगावरील सळई बाजूला सावरून दबलेल्या कामगारांना बाहेर काढले आहे. तर दोन क्रेन च्या साह्याने टिप्पर बाजूला करण्यात आला आहे, या दुर्दवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By : Krushnarav Sathe