Sakal Group exit poll for 29 municipal corporations in Maharashtra : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतसंग्राम पार पडला. मतदारांनी आपला कौल मतपेटींमध्ये नोंदवलाय. शुक्रवारी, २९ महापालिकांवर कुणाचा झेंडा फडकणार? याचा निकाल आयोगाकडून जाहीर करण्यात येईलच. पण त्याआधी सकाळ माध्यम समूहाकडून २९ महापालिकांचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलमध्ये २९ महापालिकांमध्ये भाजपचं वादळ आलेले दिसतेय. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या मदतीने भाजपने महाराष्ट्रातील महापालिकांवर झेंडा फडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूरसह राज्यातील प्रत्येक महापालिकेत भाजपचेचं वर्चस्व दिसतेय. या ठिकाणी सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपच सत्तेचा दावेदार असेल, असा अंदाज आहे. नागपूर, अकोला, अमरावती, जालना, नांदेड आणि जळगावमध्ये भाजपला एकहाती सत्ता येण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या आमदार, खासदारांनी दिवसरात्र प्रचार केला होता. नगरपरिषदेनंतर भाजपने राज्यात पुन्हा एकदा झेंडा फडकावलाय.
२० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. दोन्ही भावांची महापालिकेसाठी युती झाली. मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलोय, असे सभेत सांगण्यात आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये सभा घेतल्या. ठाकरेंनी मुंबईमध्ये शाखांना भेटी देत मतदारांना आकर्षित केले. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, ठाकरे बंधूंना महापालिकांच्या निवडणुकीत अपयश येत असल्याचे दिसतेय.
उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिकेत क्रमांक दोनच पक्ष होऊ शकतो, असा अंदाज आहे. राज ठाकरेंच्या मनसेला फक्त १० जागांवर समाधान मानावे लागतेय. तर ठाणे, कल्याण आणि नाशिकमध्ये ठाकरे बंधूंचा दारूण पराभव होत असल्याचा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरेंची मुंबईतील सत्ता जात असल्याचे दिसतेय. पण नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, पालघर, वसई विरारमध्येही ठाकरेंना जोरदार धक्का बसत असल्याचे सर्व्हेत चित्र आहे. दुसरीकडे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष दिसत आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या ठिकाणी क्रमांक एकचा पक्ष ठरत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसला मेट्रो शहरात दारूण पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना जोरदार धक्का बसू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील दोन्ही महापालिकांवर भाजप क्रमांक एकचा पक्ष होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांसोबत युती केली होती. पण याचा फारसा फायदा झालेला नसल्याचे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दिसतेय.
नगरपरिषदेप्रमाणेच महापालिकांमध्येही एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा क्रमांक दोनचा पक्ष ठरत असल्याचे चित्र सर्व्हेतून समोर येत आहे. राज्यात १५ ते २० ठिकाणी शिंदेंची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहू शकते, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. नाशिक, ठाणे, कल्याण, उल्हासनगर या ठिकाणी शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.