Sakal Global Lit Fest: साहित्य, कला, संगीत, संस्कृती आणि वैचारिक चर्चांचा अनोखा संगम पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे. येत्या १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान पुण्यात 'सकाळ ग्लोबल लिट फेस्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या परिसरात होणाऱ्या या चार दिवसीय साहित्य महोत्सवात देश-विदेशातील नामवंत लेखक, विचारवंत, कलाकार, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. चर्चासत्रे, मुलाखती, संगीत मैफली, काव्य सादरीकरण आणि नाटक अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी यानिमित्ताने मिळणार आहे.
गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी बानू मुश्ताक आणि डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका बानू मुश्ताक यांच्या बीजभाषणाने महोत्सवाला सुरुवात होईल. यावेळी 'नो स्टोरी इज स्मॉल' या विषयावर त्या आपले विचार मांडतील. याशिवाय मीरन बोरवणकर आणि तेजस्वी सातपुते पोलिस दलातील महिलांचे अनुभव सांगणार आहेत. संध्याकाळी पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. सलील कुलकर्णी आणि मधुरा दातार यांची 'मैत्र जिवांचे' ही सांगीतिक मैफल रंगणार आहे.
१३ नोव्हेंबर रोजी पर्यावरण, स्त्रीवाद, लेखन, सोशल मीडिया, ऐतिहासिक कादंबऱ्या आणि प्रकाशन क्षेत्र अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले आणि अमिश राज मुल्मी चीन आणि दक्षिण आशियातील संबंधांवर भाष्य करणार आहेत. तसेच एस. आनंद संत चोखामेळा, कबीर आणि बुद्ध यांच्या रचना धृपद शैलीत सादर करणार आहेत.
१४ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती एस. मुरलीधर, राज ठाकरे, राजू रामचंद्रन आणि प्रीती शेणॉय यांची विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, भारतीय राज्यघटना, साहित्य आणि भाषांतर अशा विषयांवर विचारमंथन होणार आहे. सायंकाळी ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे बीजभाषण होईल. तर स्पोकन वर्ड कवयित्री नायाब मिधा यांचे सादरीकरणही आकर्षण ठरणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजी अर्शिया सत्तार यांच्या बीजभाषणाने दिवसाची सुरुवात होईल. रामचंद्र गुहा, डॉ. सदानंद मोरे, हमीद दाभोलकर आणि अमिश त्रिपाठी यांसारखे मान्यवर विविध विषयांवर संवाद साधतील. याशिवाय एआय, क्रिकेट, महिलांचे आर्थिक नियोजन आणि रामायणातील विविध पैलूंवर चर्चा होणार आहे. महोत्सवाचा समारोप अभिनेता मनोज जोशी यांच्या 'चाणक्य' या हिंदी महानाट्याने होणार आहे.
या महोत्सवातील सत्रांचा आनंद घेण्यासाठी डे पास किंवा फेस्टिव्हल पास आवश्यक आहे. काही संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र तिकिटांची व्यवस्था करण्यात आली आहे. पास, तिकिटे आणि कार्यक्रमांच्या वेळापत्रकाची सविस्तर माहिती सकाळ ग्लोबल लिट फेस्टच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. साहित्यप्रेमी आणि पुणेकरांसाठी हा चार दिवसांचा महोत्सव वैचारिक मेजवानी ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.