रुपाली चाकणकर यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला
महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची शक्यता
रुपाली चाकणकरांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवलं
वादामुळे पक्षाच्या प्रतिमेला फटका
अंतिम निर्णय सुनेत्रा पवार घेणार
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याबाबत एकप्रकारे एकमत तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. मंगळवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत काही आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
या चर्चेदरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या अलीकडील वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात येत असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली. विशेषतः भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादामुळे पक्षावर टीकेची झोड सुरू झाली असून त्याचा फटका थेट पक्षाच्या प्रतिमेला बसत असल्याचं मत बैठकीत मांडण्यात आलं. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी कठोर निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही काही आमदारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या प्रकरणाचा परिणाम म्हणून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या महत्त्वाच्या पदावर असताना त्यांचं नाव वादात आल्यानं विरोधकांकडूनही तीव्र टीका करण्यात आली होती.
आता महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही त्यांना हटवण्याचा प्रस्ताव पुढे सरकत असल्याने, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला प्रदेशाध्यक्ष हे पद पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण या माध्यमातून महिलांमध्ये पक्षाचा जनाधार वाढवण्याचं काम केलं जातं.
सध्या तरी चाकणकर यांच्या भवितव्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात असून त्या काय निर्णय घेतात, यावरच पुढील राजकीय समीकरण ठरणार आहे. दरम्यान, आता एकीकडे पक्षांतर्गत दबाव, तर दुसरीकडे प्रतिमेचं राजकारण या दुहेरी कोंडीत अडकलेल्या रुपाली चाकणकर यांच्या बाबत सुनेत्रा पवार आणि पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.