नाशिक : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांचा विवाहसोहळा अखेर आज पार पडला. या दोघांच्या विवाहाला काही संघटना आणि समाजाने लव्ह जिहादचा रंग देत विरोध दर्शवला होता. मात्र साम टिव्हीने या संदर्भात वृत्त प्रसारित केल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेक पुरोगामी संघटनांनी या विवाहाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आज अगदी थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला.
हे देखील पहा -
शुभ मंगलसावधानच्या मंत्रोच्चारात आज नाशिकमध्ये आडगावकर कुटुंबातील रसिका आणि खान कुटुंबातील आसिफ खान या दोघांचा विवाहसोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. या विवाहसोहळ्याची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही धार्मिक संघटना आणि सामाजिक संघटनांनी या विवाहाला लव्ह जिहादचा रंग देत विरोध दर्शवला होता.
आडगावकर कुटुंबियांवर दबाव टाकून त्यांना विवाहसोहळा रद्द करण्यास देखील भाग पाडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर साम टिव्हीने यासंदर्भात वृत्त प्रसारित केल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेक पुरोगामी संघटना आणि जातपंचायत मूठमाती अभियानाकडूनही रसिका आणि आसिफच्या विवाहाला पाठिंबा मिळाला. या विवाहाला होणारा विरोध आणि धमक्यांना न जुमानता हिंदू पद्धतीने वैदिक मंत्रोच्चारात रसिका आणि आसिफचा विवाह पार पडला. मोठ्या अडचणीनंतर अखेर विवाह पार पडल्यानं रसिका आणि आसिफ दोघांच्याही आनंदाला उधाण आलं.
हिंदू आणि मुस्लिम परिवाराच्या या विवाह सोहळ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जातपंचायत मूठमाती अभियान, प्रहार संघटनेसह अन्य सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावत या सोहळ्याला पाठिंबा दिला. तर इतका टोकाचा विरोध होऊनही अखेर मुलीचा थाटामाटात विवाह पार पडल्यानं वधूपिता प्रसाद आडगावकर यांनीही सर्वांचे आभार मानत समाधान व्यक्त केलं.
"मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी" असं बोललं जातं. मात्र रसिका, आसिफ आणि दोघांचेही कुटुंबीय विवाहाला तयार असतांनाही तसेच दोघांचाही 21 मे रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह झालेला असतानाही त्यांच्या विवाहावर आक्षेप घेण्यात येत होता. दबाव टाकून त्यांचा 18 जुलैला होणारा विवाह रद्द करण्यात आला. त्यामुळे आता हा विवाह होणार की नाही? अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र विरोध दर्शवणाऱ्यांचा विरोध झुगारून आज रसिका आणि आसिफ बोहल्यावर चढले आणि त्यांची प्रेमकहाणी अखेर पूर्ण झाली.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.