Rajya Sabha Election 2026 Mahayuti Candidate Name List : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार, महायुतीला ६ तर मविआला फक्त एक जागा मिळणार आहे. राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महायुतीच्या वाट्यातील ६ जागांपैकी ४ जागा भाजपला मिळणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. महायुतीकडून ६ जागांसाठी कोणाची निवड केली जाणार? यावर राजकीय चर्चा सुरू आहे. महायुतीच्या ३ उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. कोणत्या ३ नेत्यांना संधी दिली जाणार आहे? त्याबाबत जाणून घेऊयात...
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यामध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्या. आता दिल्लीमध्ये पार्थ पवार सक्रिय होतील.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला राज्यसभेची एक जागा मिळणार आहे. त्या एका जागेसाठी शिवसेनेत मोठी लॉबिंग सुरू असल्याचे समजते. पण एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गजानन कीर्तिकर हेदेखील राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहेत, पण शिंदेंकडून शेवाळेंची निवड होणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. पुढील २ दिवसांत शेवाळेंच्या नावाची घोषणा होऊ शकते.
राज्यसभेसाठी भाजपकडून ४ नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामधील रामदास आठवले यांना एक जागा सोडली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. रामदास आठवले सध्या केंद्रात मंत्री आहेत. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून आठवलेंना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपकडून उर्वरित ३ नावे कोण असतील? याबाबत सस्पेन्स कायम आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यामध्ये भाजपच्या राज्यसभेच्या ४ नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विनोद तावडे, विजया रहाटकर, प्रीतम मुंडे आणि धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण भाजपकडून कोणत्या नावाला पसंती दिली जाते, हे २ दिवसात स्पष्ट होईल.
महाविकास आघाडीला राज्यसभेसाठी एकच जागा मिळाली आहे, पण त्यासाठी ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येक पक्षाकडून त्या जागेवर दावा केला जात आहे. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेने उघडपणे एका जागेवर दावा केला आहे, तर दुसरीकडे शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी राज्यसभेत जावे अशी सर्वांची इच्छा आहे, परंतु अद्याप त्यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली नाही. त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांचा निर्णय अपेक्षित आहे. तर विद्यमान खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे समजते. काँग्रेसकडून अद्याप कोणतेही नाव समोर आलेले नाही, पण पक्षाकडून दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) २० आणि काँग्रेसचे १६ आमदार आहेत. मविआकडे ४६ आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची ३७ मते आवश्यक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.