सचिन कदम| रायगड, ता. २ सप्टेंबर २०२३
Raigad Politics News: राज्यात विधानसभेचे बिगुल वाजण्याआधीच महायुतीमध्ये वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून आता रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यामधील वाद टोकाला गेला आहे. राष्ट्रवादी महायुतीमध्ये राहून आमच्याशी दगाबाजी करत असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. तर दुसरीकडे टप्प्यात आला की वेध घ्यायचा असे म्हणत आमदार भरत गोगावले यांनीही इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रसवर महायुतीत असूनही दगाबाजी करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कर्जतमध्ये झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या जाहीर मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
"महायुतीमधील घटकपक्ष आपल्या सरकारमधील निधी घेवून आपल्याच सरकारच्या माध्यमातून विकासकामे करून आपल्याशीच दगाबाजी करत असल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमधील जाहिर मेळाव्यात केला. यावेळी मत्री उदय सामंत यांनी त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे शिकार टप्प्यात आला की वेध घ्या, गोळी वाया घालवू नका," सल्ला मित्रत्वच्या नात्याने दिला. यामुळे रायगडमध्ये महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीत विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा वादंग होण्याची चिन्ह दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि आमचे कधीही पटले नाही, सध्या मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. अशी जहरी टीका करत राष्ट्रवादी अजित पवार गटावर निशाणा साधला होता. सावंत यांच्या या टीकेवरुन महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली असून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदेकडे तक्रार केली होती. अशातच आता आणखी एका नेत्याने अजित पवार गटावर निशाणा साधल्याने महायुतीमध्ये पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाने मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र थोरवे, आ. भरत गोगावले , आ. महेंद्र दळवी आदि उपस्थित होते. पिंगळे यांनी यापूर्वी 2 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. कर्जत मध्ये दोन्ही मित्र पक्षात संघर्ष सुरू असतानाच पिंगळे यांच्या शिवसेना प्रवेशाने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.